नगर-मनमाड रोडवरील सावेडीच्या स्टेट बँक शाखेकडून एका माजी सैनिकाने मोबाइल घेण्यासाठी ३० हजारांचे कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीसाठी ठरावीक हप्ते पाडून देण्यात आले. परंतु कर्ज मंजूर केल्याबरोबर बँकेने माजी सैनिकाच्या खात्यातून ३० हजार रुपये कपात केली. शिवाय हप्ताही सुरू झाला. संबंधित माजी सैनिकाने बँकेची ही चूक त्यांच्या निदर्शनास आणून देऊनही गेले सात ते आठ महिने बँकेने दखल घेतली नाही. ही बाब प्रहार सैनिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोदसिंग परदेशी, सचिव ॲड. संजय शिरसाठ यांना समजल्यानंतर त्यांनी गुरुवारी (दि. २९) बँकेसमोर उपोषण सुरू केले.
दिवसभर उपोषण केल्यानंतर रात्री उशिरा बँकेने आंदोलनाची दखल घेत आपली चूक मान्य केली व तातडीने माजी सैनिकाला दिलासा देण्याचे लेखी मान्य केले. तसेच बँकेच्या ज्या कर्मचाऱ्यांकडून ही चूक झाली त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आश्नासन दिले. त्यानंतर संघटनेने हे आंदोलन मागे घेतले, अशी माहिती विनोदसिंग परदेशी यांनी दिली.
------
फोटो - ३०प्रहार आंदोलन
प्रहार सैनिक संघटनेच्या आंदोलनाची दखल घेत स्टेट बँकेच्या सावेडी शाखेच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.