साईनगरीत काल्याचे कीर्तन झाले, पण भाविक नाही आले; गुरूपौर्णिमा उत्सवाची दहीहंडी फोडून सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 04:52 PM2020-07-06T16:52:41+5:302020-07-06T16:53:09+5:30

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साईनगरीतील ११२ व्या गुरूपौर्णिमा उत्सवाची काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून सोमवारी (दि.६ जुलै) सांगता करण्यात आली.

kalyache kirtan in Sainagari, but no devotees came; end of Gurupournima festival | साईनगरीत काल्याचे कीर्तन झाले, पण भाविक नाही आले; गुरूपौर्णिमा उत्सवाची दहीहंडी फोडून सांगता

साईनगरीत काल्याचे कीर्तन झाले, पण भाविक नाही आले; गुरूपौर्णिमा उत्सवाची दहीहंडी फोडून सांगता

शिर्डी : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साईनगरीतील ११२ व्या गुरूपौर्णिमा उत्सवाची काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून सोमवारी (दि.६ जुलै) सांगता करण्यात आली.
सोमवारी सकाळी काकड आरतीनंतर संस्थानचे पुजारी विलास जोशी यांनी समाधी मंदिरात सपत्नीक पाद्यपूजा केली. त्यानंतर पुजारी चंद्रकांत बोरकर यांनी गुरूस्थान मंदिरात सपत्नीक रूद्राभिषेक पूजा केली. सकाळी दहा वाजता समाधी मंदिरात पुजारी उल्हास वाळुंज यांनी काल्याचे कीर्तन सादर केले. या कीर्तनानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांच्या हस्ते परंपरेनुसार दहीहंडी फोडण्यात येऊन उत्सवाची सांगता करण्यात आली.
यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पर्यवेक्षक रामदास कोकणे, तुरकणे आदी उपस्थित होते.
दोन महिन्यापूर्वी कोरोना लॉकडाऊनमधील रामनवमी उत्सव व १९४२ सालातील कॉलरामुळे बंद ठेवण्यात आलेला रामनवमी उत्सव वगळता साईनगरीतील गुरूपौर्णिमा उत्सव प्रथमच भाविकांच्या अनुपस्थितीत पुजाऱ्यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. पालखी व रथ मिरवणुकीसारख्या मंदिराबाहेरील कार्यक्रमांनाही कात्री लावण्यात आली. एरवी उत्सवात गर्दीने ओसंडून वाहणारे रस्ते, पदयात्री-पालख्यांतील भाविकांकडून होत असलेला साईनामाचा गजर, ढोल-ताशांचे आवाज, पालखी समोरील पारंपरिक नृत्य, रथ मिरवणुकीसाठीची अलोट गर्दी, मंदिर व परिसरात होणारी आनंदाची उधळण, भाविकांकडून गुरूदक्षिणा म्हणून बाबांना अर्पण करण्यात येणाºया सोने-चांदीच्या वस्तू, उत्सवानिमित्त प्रसादालयातील तीन दिवसांचे मिष्टान्न भोजन आदी बाबींना यंदा भाविक पारखे झाले.

विश्वस्तांची अनुपस्थिती

संस्थानच्या अधिकाऱ्यांनी पुजारी व कर्मचाºयांच्या हातून करवून घेतलेले विविध धार्मिक विधी, कोविड योद्ध्यांना साईसच्चरित्र पारायणात ग्रंथ वाचनाची संधी दिली. आर्थिक मंदीतही भाविकांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गुरूपौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबिर हीच काय ती यंदाच्या उत्सवाची वैशिष्ट्ये होती. एकूणच यंदाचा गुरूपौर्णिमा उत्सव ऐतिहासिक ठरला.

Web Title: kalyache kirtan in Sainagari, but no devotees came; end of Gurupournima festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.