कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना धक्का? सुरुवातीच्या मतमोजणीत राम शिंदेंची आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:07 AM2024-11-23T10:07:28+5:302024-11-23T10:08:11+5:30
karjat jamkhed Assembly Election 2024 Result Live Updates : कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी सुरुवातीच्या मतमोजणीत आघाडीत घेतली आहे. तर शरद पवार गटाचे रोहित पवार सध्या पिछाडीवर आहेत.
karjat jamkhed Assembly Election 2024 Result Live Updates : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात सुरुवातीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी अल्पशी आघाडी घेतली आहे. तर शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार सध्या पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदंचद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) विधानसभेच्या रिंगणात होते.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये एमआयडीसीचा मुद्दा गाजला होता. रोहित पवार यांनी कर्जत जामखेडच्या एमआयडीसीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. रोहित पवार यांनी विधानभवनात या मुद्यावर आंदोलन देखील केलं होतं. रोहित पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली होती.
विधानसभेच्या २८८ मतदारसंघाचं चित्र होणार स्पष्ट
अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात सत्ता बदल होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल. २८८ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यावेळी २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी राज्यात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे.