डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 07:44 PM2024-11-23T19:44:09+5:302024-11-23T19:44:49+5:30
karjat jamkhed Assembly Election 2024 Result Live Updates : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांचा निकाल अखेर समोर आलं आहे.
karjat jamkhed Assembly Election 2024 Result Live Updates : राज्यात २८८ विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत अनेक जिल्ह्यांतून महाविकास आघाडी हद्दपार झाल्याचे पाहायला मिळाले. अहिल्यानगर जिल्ह्यात लोकसभेला महाविकास आघाडीच्या पारड्यात घवघवीत यश टाकणाऱ्या जनतेने विधानसभेला मात्र पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गजांना इथं पराभवाचा धक्का बसला आहे. दरम्यान, कर्जत जामखेडमध्ये शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांचा निकालही आता स्पष्ट झाला आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघात शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांना निसटता विजय मिळाला आहे. सुरुवातीला त्यांचा ३५२ मतांनी पराभव झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र, मशीनमध्ये तांत्रिक घोळ झाल्याने या जागेवर पुन्हा मतमोजणी करण्यात आली. यामध्ये रोहित पवार यांनी आघाडी घेत विजय नोंदवला आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. दरम्यान, याआधी बारामती मतदारसंघात शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा दारुण पराभव झाला आहे.
कर्जत-जामखेडमध्ये महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांचा १२४३ मतांनी विजय झाला आहे. रोहित पवार यांना १ लाख २७ हजार ६७६ मते मिळाली. तर महायुतीचे आमदार राम शिंदे यांना १ लाख, २६ हजार ४३३ मते मिळाली आहे. अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना ३४८९ मते मिळाल्याचा फटका रोहित पवार यांना बसल्याचे पाहायला मिळाले. तर अपक्ष राम नारायण शिंदे यांना ३९२ तर नोटाला ६०१ मते मिळाली.
अहिल्यानगरच्या १२ विधानसभा मतदारसंघात काय चित्र?
नगर शहर विधानसभा : मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी विकासकामांच्या जोरावर विजयश्री खेचून आणला. जगताप यांनी या विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची हॅट्रिक पूर्ण केली आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते, ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे आणि अपक्ष म्हणून राहुल जगताप निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत पाचपुते यांचा ३६,८२७ मतांनी विजयी झाला. ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यात. पाचपुते यांना ९९,००५, जगताप यांना ६२,१७८ आणि नागवडे यांना ५३,१७६ मते मिळालीत.
शिर्डी विधानसभा मतदारसंघ : या मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे निकाल लागलाय. महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांचा ७०,२८२ मतांनी पराभव केलाय.
संगमनेर विधानसभा मतदारसंघ : काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना पहिल्यांदाच पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. शिंदे गटाचे अमोल धोंडीबा खताळ या संपूर्ण निवडणुकीत एक मोठे जायंट किलर म्हणून समोर आले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघ : येथे अजित पवार गटाचे आशुतोष काळे आणि शरद पवार गटाचे संदीप वर्पे यांच्यात सरळ लढत झाली. या दोन्ही राष्ट्रवादींच्या लढतीत अजित पवार गटाने बाजी मारली. काळे यांनी १,२४,६२४ मतांनी वर्पे यांचा पराभव केला.
नेवासा विधानसभा मतदारसंघ : येथे शिंदे गटाचे विठ्ठल वकीलराव लंघे आणि ठाकरे गटाचे शंकरराव गडाख यांच्यात फाईट झाली. विठ्ठल लंघे यांनी ४,०२१ मतांनी गडाखांचा पराभव केला.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ : या मतदारसंघात काँग्रेसचे हेमंत ओगले आणि शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांच्यात लढत झाली. या लढतीत हेमंत ओगले यांनी १३,३७३ मतांनी कांबळे यांचा पराभव केला.
अकोले विधानसभा मतदारसंघ : येथे अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे, शरद पवार गटाचे अमित भांगरे आणि अपक्ष म्हणून वैभव पिचड यांच्यात तिरंगी लढत झाली. या लढतीत अजित पवार गटाचे किरण लहामटे यांनी ५,५५६ मतांनी विजय मिळवला.
शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ : येथे भाजपाच्या मोनिका राजळे, शरद पवार गटाचे प्रतापराव ढाकणे आणि अपक्ष म्हणून चंद्रशेखर घुले पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे. सध्या स्थितीला या मतदारसंघात मोनिका राजळे आघाडीवर आहेत.
राहुरी विधानसभा मतदारसंघ : या मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राजक्त तनपुरे आणि भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव कर्डिले यांच्यात लढत झाली. गेल्या निवडणुकीत तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव केला होता. मात्र ह्या निवडणुकीत आता कर्डीले यांनी मागील पराभवाचा बदला घेतला आहे.
पारनेर विधानसभा मतदारसंघ : पारनेर विधानसभा मतदारसंघातही यंदा चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाचे काशिनाथ महादू दाते आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके निवडणुकीच्या रिंगणात होत्या. या ठिकाणी दाते २,४०६ मतांनी विजयी झाले आहेत.