केडगाव : केडगाव आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी चालणारी रोजची कसरत पाहून महापालिकेने भूषणनगर व देवी मंदिर परिसरासाठी दोन लसीकरण उपकेंद्राना मंजुरी दिली आहे. आता केडगावात तीन ठिकाणी लसीकरण सुरू होणार असल्याने एकाच ठिकाणी होणारी गर्दी आता नियंत्रणात येईल.
केडगाव आरोग्य केंद्रात आतापर्यंत ८ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एकाच ठिकाणी लसीकरण केंद्र असल्याने नागरिकांच्या पहाटेपासूनच रांगा लागत आहेत. दररोज जवळपास ३०० ते ४०० नागरिक रांगेत उभे राहूनही अनेकांना लसीपासून वंचित राहावे लागते. लसीचा रोजचा अपुरा पुरवठा होत असल्याने रांगेत असणाऱ्यांना पुन्हा रिकाम्या हाताने परतावे लागत.
यामुळे माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांनी भूषणनगर येथे तर नगरसेवक मनोज कोतकर यांनी देवी मंदिर परिसरात लसीकरणाचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. महापालिकेने भूषणनगर येथील जिल्हा परिषद शाळेत तर देवी मंदिर परिसरातील नागरिकांसाठी विद्या प्रतिष्ठानच्या शिक्षण संकुलात लसीकरण उपकेंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.