रमेश श्रीहरी सुरुंग (वय ४५, मूळ रा. वाडमुखवडी, दिघी, जि. पुणे) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. यातील तक्रारदाराने खादी ग्रामोद्योग कार्यालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गत पेव्हिंग ब्लॉक व्यवसायासाठी २५ लाख रुपयांचे कर्ज प्रकरण महाराष्ट्र बँकेच्या हंगेवाडी (ता. श्रीगोंदा) शाखेत दाखल केले होते. हे कर्ज प्रकरण बँकेच्या व्यवस्थापकाकडून तातडीने मंजूर करून घेत त्याची सबसिडी लवकर मिळवून देण्यासाठी सुरुंग याने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. पथकाने सापळा लावला तेव्हा सुरुंग याने पंचासमक्ष तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारले. लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम पवरे, करांडे, पोलीस नाईक विजय गंगुल, रवींद्र निमसे, राधा खेमनर, राहुल सपट यांच्या पथकाने ही कारवाई केली.
खादी ग्रामोद्योग अधिकाऱ्यास लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:16 AM