कोपरगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोपरगाव उपविभागामार्फत सुरू असलेल्या कोपरगाव - कोकमठाण या रस्त्याच्या डांबरीकरणाचे सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे. काम सुरू असतानाच रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायातीच्या ना हरकत दाखल्यानंतर हे सुरू करावे, असा पत्रव्यवहार ग्रामपंचायतीमार्फत बांधकाम विभागाला सोमवारी ( दि. १२ ) करण्यात आला आहे.
कोपरगाव - कोकमठाण - सडे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम इतके निकृष्ठ होत आहे की, काम सुरू असतानाच ठिकठिकाणी हा रस्ता उखडला आहे, तसेच हे काम करताना रस्त्याच्या पृष्ठभागावर एकसमानता नसून रस्ता खालीवर आहे. त्यामुळे हे काम गुणवत्तापूर्वक करणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे या रस्त्याचे लगेचच वाटोळे होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील काम सुरु करताना ग्रामपंचायतीची ना हरकत असल्याशिवाय सदरचे काम सुरू करू नये.