माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांच्या पुढाकारातून हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पैसे असूनही अनेकांना वेळेत उपचार मिळत नाहीत. अशा परिस्थितीत रस्त्यावर फिरणारे बेघर, बेवारस, मनोरुग्णांवर कोण उपचार करणार? असा प्रश्न आहे. अनेकदा या व्यक्तींनाही कोरोनाची लागण झालेली असते; परंतु त्याची कुठे तपासणी किंवा नोंद होत नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अशा महिलांना सध्या माऊलीच्या वाय. एस. साने इंद्रधनू प्रकल्प व मनगाव या प्रकल्पात पूर्वीप्रमाणे दाखल करून घेता येत नाही. कदाचित येथे येणारी महिला जर कोरोना पॉझिटिव्ह असेल तर सध्याच्या दाखल महिलाही बाधित होण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रकल्पात नव्याने दाखल होणाऱ्या महिलांची कोरोना व इतर वैद्यकीय तपासणी करून व चौदा दिवस विलगीकरणात ठेवूनच त्यांना मुख्य प्रकल्पात दाखल करून घेतले जाणार आहे. यासाठी २० खाटांचे कोरोना सेंटर सुरू करण्यात आले असून येथे सर्व वैद्यकीय उपचारासोबत ऑक्सिजन व दोन अतिदक्षता बेडचीही सुविधा उपलब्ध केली आहे.
पहिल्या टप्प्यात हे सेंटर फक्त रस्त्यावरील अनाथ महिला व त्यांच्या मुलांसाठी असेल, तर पुढच्या टप्प्यात पुरुषांसाठीही ते सुरू करण्याचा विचार असल्याचे डॉ. धामणे यांनी सांगितले.
................
मनोरुग्ण महिलांना प्रकल्प दाखल करावे
सध्या माऊलीच्या दोनही प्रकल्पांत एकूण ३५० महिला व त्यांची येथेच जन्मलेली ३० मुले कायमस्वरूपी राहत आहेत. रस्त्यावर बेघर, मनोरुग्ण महिला आढळून आल्यास त्यांना माऊली प्रतिष्ठानच्या प्रकल्पात दाखल करावे, असे आवाहन डॉ. धामणे दाम्पत्यांनी केले आहे.