युरिया खरेदीसाठी दुकानासमोर मोठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 11:27 AM2020-07-13T11:27:20+5:302020-07-13T11:29:17+5:30
शेवगाव : युरीया खताची चणचण, त्यातच कृषी सेवा केंद्रांच्या तीन दिवसांच्या संपानंतर सोमवारी युरीया खत बाजारात उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी युरिया खरेदीसाठी शहरातील दुकानासमोर मोठी गर्दी केली. युरीया खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. त्यात चापडगावात महिलांची संख्या मोठया प्रमाणात होती.

राज्यातील कृषी सेवा केंद्रांनी शुक्रवार ( दि.१० ) ते रविवार ( दि. १२ ) असा तीन दिवसाचा संप पुकारला होता. या संपादरम्यान कृषी दुकानदारांनी कडकडीत बंद पळाला. तीन दिवसांनंतर तालुक्यातील कृषी सेवा दुकाने सोमवारी उघडली. त्यातच युरिया खत दुकानांत विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी अचानक केलेल्या गर्दीमुळे कृषी दुकान चालकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत होते. शेतकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या, त्या रांगेत महिला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता. महिला वर्गाला प्रथम प्राधान्याने खत दिले जात होते.
युरीया खताची बॅग बाजारात किंमत २६६ ते २७० रूपयाने विक्री केली जात होती. तीन दिवस दुकाने बंद असल्याने शेती विषयक साधने, वस्तू , बियाणे, फवारणीसाठी औषध घेतांना शेतकरी दिसून येत होते. दुपारनंतर काही प्रमाणात गर्दी ओसारली होती. मात्र सकाळी कोरोना संसर्गाचा धोका समोर दिसत असूनही गर्दीत उभा राहून शेतकऱ्यांनी खत खरेदी केले. यावेळी अनेकांच्या तोंडाला मास्क नव्हता.