Ahmednagar: खून प्रकरणातील नऊ आरोपींना जन्मठेप, कोपरगाव सत्र न्यायालयाचा निकाल
By सचिन धर्मापुरीकर | Published: October 31, 2023 06:28 PM2023-10-31T18:28:23+5:302023-10-31T18:28:46+5:30
राहाता तालुक्यातील लोहगाव येथे शेतीच्या वादातून डोक्यात कुदळ मारून एका इसमाचा खुन करण्यात आला होता. या प्रकरणी कोपरगाव येथील सत्र न्यायालयाचे अति. सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी नऊ आरोपींना दोषी ठरवत, जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
- सचिन धर्मापुरीकर
कोपरगाव (जि. अहमदनगर) - राहाता तालुक्यातील लोहगाव येथे शेतीच्या वादातून डोक्यात कुदळ मारून एका इसमाचा खुन करण्यात आला होता. या प्रकरणी कोपरगाव येथील सत्र न्यायालयाचे अति. सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी नऊ आरोपींना दोषी ठरवत, जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सदर खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, लोणी पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे लोहगाव (ता. राहाता) येथील सर्वे नं ६० मधील शेतीच्या वादातून अमोल नेहे, किशोर नेहे, वसंत नेहे, सुरेश नेहे, सचिन नेहे, प्रसाद नेहे, आकाश नेहे, मयूर नेहे व जगन्नाथ पांडगळे या नऊ जणांनी गौरव अनिल कडू यांच्या डोक्यात कुदळ मारून व लोखंडी रॉडने मारहाण केली होती. यात गौरव कडू गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खूनाच्या आरोपाखाली वरील नऊ जणांविरूद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गू.र.नं. १/ २०२१ भा.द.वि. कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४८ १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पूर्ण होउन कोपरगाव येथील अति सत्र न्यायालयात वरील नऊ आरोपी विरुद्ध दोषारोप दाखल झाले होते.
सदर खटल्यामध्ये सरकार तर्फे अति. सरकारी अभियोक्ता शरद गुजर यांनी काम पाहीले. सदर प्रकरणात एकूण अकरा साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, शवविच्छेदन अहवालन, तपासी अधिकारी यांचे जबाब नोंदविण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार याची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी वकीलांनी त्यांच्या युक्तिवादात सर्व मुद्दे न्यायालयापुढे सिध्द केले. सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून कोपरगाव येथील अति. सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी सर्व नऊ आरोपींना दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच एकूण एक लाख ८० हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडाच्या रकमेपैकी मयताच्या कुटुंबास नुकसान भरपाई पोटी एक लाख ५० हजार रुपये देण्याचे आदेश करण्यात आले आहे. सदर प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून लोणी पोलिस स्टेशनचे ए.एस.आय. नारायण माळी यांनी काम पाहिले.