लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी : उन्हाळ्यात कुंभार बांधव मातीला आकार देऊन नवनवीन भांडी तयार करतो. ही भांडी विकलेल्या पैशांतून तो उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावत असतो; मात्र यंदा कुंभार बांधवांनी मातीला आकार दिला खरा, पण तयार केलेले माठ खरेदीसाठी लॉकडाऊनमुळे ग्राहक फिरकत नसल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. मातीला आकार देणाऱ्यांच्या जीवनाला आधार मिळत नसल्याचे सध्या चित्र आहे.
मागील वर्षीपासून लॉकडाऊनमुळे कुंभार बांधवांवर संकट ओढावले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या घरी आजही फ्रीज नाही. त्यामुळे वाढत्या तापमानाची काहिली दूर करण्याकरिता थंड पाण्याच्या मातीच्या माठाला मोठी मागणी असते. या दिवसात तयार केलेल्या माठाची सर्वांना आठवण येते. त्यामुळे घरोघरी थंड पाण्याकरिता माठाचा उपयोग केला जातो.
मागील वर्षी व यंदासुद्धा लॉकडाऊनने हा सारा व्यवसायच लॉक झाला आहे. राहाता तालुक्यात १०० ते १५० च्या जवळपास कुंभार बांधव आहेत. ते इतर वेळी म्हणजेच गणपती, शारदा, दुर्गा, लक्ष्मी आदी मूर्ती तयार करतात तसेच दिवाळीला मातीचे दिवेदेखील तयार करतात. याच व्यवसायातून आलेल्या मिळकतीतून उदरनिर्वाह करतात. वंशपरंपरागत चालत आलेला हा त्यांचा व्यवसाय आहे; परंतु आजघडीला पार कोलमडून गेला आहे. लॉकडाऊनमुळे माठांची खरेदी करण्यासाठी ग्राहक त्यांच्याकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. तर त्यांनासुद्धा बाहेरगावी माठ विक्रीसाठी जाता येत नसल्याने त्यांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शासनाने कुंभार समाजबांधवांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे.
.............
लाॅकडाऊनमुळे सध्या व्यवसाय ठप्प झाला आहे. आठवडी बाजार बंद आहे. बाहेरगावी जाता येत नाही आणि बाहेरगावावरून ग्राहक येत नाहीत. चौकात दुकान लावले, तर ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागते. सध्या सकाळी ११ पर्यंतच दुकानांची वेळ आहे. विक्री होत नाही. जीवन कसे जगावे, हाच प्रश्न आहे.
- लहानू लक्ष्मण दळवी,
कोल्हार, ता. राहाता.
...........१३लोणी..........