Lockdown: अहमदनगरमध्ये ७ दिवस कडक लॉकडाऊन: फक्त अत्यावशक सेवा सुरू उर्वरित सर्व बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 09:26 PM2021-05-01T21:26:54+5:302021-05-01T21:27:42+5:30
आरोग्य सुविधा सोडून फक्त दूध सकळी ७ ते ११ पर्यत विक्री चालू राहणार आहे. तसेच किराणा विक्री व भाजीपाला विक्री बंद राहणार आहे.
अहमदनगर : नगर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग तोडण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेने सात दिवसाचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.
रविवारी (दि. 2 मे ) रात्री बारा वाजल्यापासून ते १० मेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये आरोग्य सुविधा सोडून फक्त दूध सकळी ७ ते ११ पर्यत विक्री चालू राहणार आहे. तसेच किराणा विक्री व भाजीपाला विक्री बंद राहणार आहे. शेतकऱ्यांनी नगर शहरामध्ये शेतीमाल विक्रीस आणू नये, अन्यथा मनपाच्यावतीने कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.
कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहराचे आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे, महापालिका दक्षता पथक प्रमुख शशिकांत नजान, कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी मार्केट यार्ड महात्मा फुले चौक येथे पाहणी केली.
पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे यांनी यावेळी सांगितले की, नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये कोणीही जॉगिंगसाठी बाहेर पडू नये. विनाकारण फिरणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यानी सांगितले. दरम्यान जिल्ह्यात आज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चार हजार पार गेला आहे. नगर शहरात रोज. सातशे ते आठशे रुग्ण बाधित होत आहेत. शहरातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर हे कडच निर्बंध लागू करण्यात आले आहेत.