कोपरगाव : तालुक्यातील वडगाव बक्तपूर येथील दशरथ रावबा डोंगरे यांच्या शेतावर असलेल्या गिन्नी गवतावर टोळधाड सदृश्य किडे आढळून आले आहेत. मात्र हे किडे येथेच तयार झालेले असून त्याच्यावर रासायनिक फवारणी करून नियंत्रणात आणता येऊ शकते, असे कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी सोमवारी (दि.१ जून ) वडगाव बक्तपूर येथे शेतक-यांना सांगितले.
रविवारी रात्री वडगाव बक्तपूर येथील शेतकरी संजय कांगणे यांनी दशरथ रावबा डोंगरे यांच्या शेतावर असलेल्या टोळधाड सदृश्य कीड आली असल्याचे फोटो व माहिती कृषी विभागाला कळविली. सोमवारी सकाळीच तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, मंडळ कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कृषी सहायक निलेश बिबवे, संजय बोंबे यांनी प्रत्यक्षात डोंगरे यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली. त्यावर शेतातील गिन्नी गवतावर टोळधाडीने नुकसान केलेले निदर्शनास आले.
आसपासच्या परिसरातील शेतांची पाहणी केली आहे. सर्व प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रावर क्लोरोपायरीफॉस या रासायनिक कीटकनाशक प्रमाणानुसार पाण्यात मिसळून फवारणी करावी. या किडीच्या प्रादुर्भावापासून बचाव करायचा असल्यास प्रत्येक शेतक-यांनी सतर्क राहने गरजेचे आहे. कारण सध्याचे वातावरण या किडीला पोषक असल्याने केव्हाही याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, असेही कृषी अधिकारी आढाव यांनी सांगितले.दरम्यान, या टोळधाडीने शेतक-यात चिंतेचे वातावरण आहे.