Lok Sabha Election 2019: अपक्षही उतरणार रणांगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:32 AM2019-03-29T11:32:56+5:302019-03-29T11:32:58+5:30
नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांसह विविध आघाड्या व इतर पक्षही रिंगणात उतरणार आहेत.
अहमदनगर/ श्रीरामपूर : नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांसह विविध आघाड्या व इतर पक्षही रिंगणात उतरणार आहेत. शिर्डीत युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी उमेदवारी करण्याची घोषणा केली आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सेना-भाजपमध्ये बंडखोरी केल्यानंतर आता गायकवाड यांच्या रूपाने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
आंबेडकरी चळवळीतील नेते गायकवाड यांनी श्रीरामपुरात पत्रकार परिषदेत उमेदवारीची घोषणा केली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सचिव अॅड. सादिक शिलेदार, भाऊसाहेब पगारे, राजेंद्र साठे, राजेंद्र वाघ, बाळासाहेब शिंदे, पोपटराव पुंड आदी उपस्थित होते. शिर्डी मतदारसंघात काँग्रेस आघाडीकडून आपल्याला उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. माजी खासदार यशवंतराव गडाख यांनीही त्यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार गेली दोन महिने आपण तयारी केली होती, असे गायकवाड यांनी यावेळी सांगितले. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील गटबाजीमुळे ऐनवेळी येथे कांबळे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. राज्यात सर्व जागांवर आपण काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीत आहोत. मात्र शिर्डीत मैैत्रीपूर्ण लढत करणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही याबाबत कल्पना दिली आहे, असे ते म्हणाले.
घराणेशाहीविरोधात माझी उमेदवारी: सावंत
महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील माजी खेळाडू, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या
माजी सभापती अॅड़ कमल सावंत आता लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत़ नगर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणार असल्याची घोषणा त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली़ घराणेशाहीच्या विरोधात व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपली उमेदवारी असल्याचे त्या म्हणाल्या. उमेदवारीसाठी कोणीही उठतो, कोणत्याही पक्षात प्रवेश करतो आणि त्याला तिकिटही दिले जाते़ हे म्हणजे आयपीएलच्या सामन्यांसारखे झाले आहे़, अशी टीका त्यांनी केली.
सर्वच पक्षांनी समाजाला फसविले: भोर
राजकीय सत्तेच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चा, शेतकऱ्यांचा संप दडपण्यात आला आहे. नेते केवळ समाजाचा वापर करतात. त्यामुळे प्रस्थापित व घराणेशाही विरोधात आपली लढाई असल्याचे शिवप्रहारचे प्रमुख संजीव भोर यांनी नगर येथे बोलताना सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवप्रहार व मराठा मोर्चातील कार्यकर्ते, तसेच विविध सामाजिक संघटनांची बैठक नगर शहरात झाली. या बैठकीत भोर यांच्या उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, विजय काकडे, प्रदीप बिल्लोरे, राहुन बनसोडे, शिवाजी चौधरी, मंगेश अजबे, अनिल देठे, सचिन चौगुले, बाळासाहेब पठारे आदींची उपस्थिती होती. अलीकडच्या काळात घराणेशाहीच्या वारसदारांनी सत्ता आणि संपत्तीच्या माध्यमातून पुन्हा सरंजामशाही प्रस्थापित केली़ एका घरात अनेक राजकीय पदे असताना त्यांच्याच घरातील उमेदवार दिले जात असल्याची टीका रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी केली़