अहमदनगर : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व भाजपमधील अंतर कमी झाले असून, त्यांच्याकडे आता भाजपमध्ये प्रवेश करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, मोदींच्या सभेत विखेंचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता नाही, असेही सांगण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारसभेसाठी शुक्रवारी नगरला येणार आहेत. या सभेच्या नियोजनाबाबत शिंदे व भाजपचे सूरजितसिंग ठाकूर यांनी पत्रकारांना माहिती दिली. मोदी यांच्या सभेत सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे हे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. याबाबत छेडले असता सूरजितसिंग म्हणाले, सभेत प्रवेशाचे काहीही नियोजन नाही. पंतप्रधानांच्या सभेत पक्षीय प्रवेश होत नाहीत. त्यामुळे विखे यांच्या प्रवेशाची लगेच शक्यता दिसत नाही.शिंदे म्हणाले, भाजपने १२ मार्च रोजी सुजय यांच्या उमेदवारीची घोषणा केली़ तेव्हापासून २९ दिवसात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व भाजप यांच्यातील अंतर कमी झाले आहे़ काँग्रेसचे विरोधी पक्षनेते महायुतीचे उमेदवार सुजय यांचा प्रचार करत आहेत ही पक्षासाठी आनंदाची बाब आहे़ भाजपच्या दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीलाही ते उपस्थित होते.राष्टÑवादीच्या पत्राला काँग्रेसकडून प्रतिसाद नाहीविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे भाजपचा प्रचार करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसने केली आहे. याबाबत काँग्रेसकडून अद्याप काहीही प्रत्युत्तर आलेले नाही, असे राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही काँग्रेसने नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रचार फलकांवर विखेंचे छायाचित्र वापरणे टाळलेले आहे.
Lok Sabha Election 2019 : राधाकृष्ण विखे आमच्यासोबत : राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:27 PM