लोकमत इफेक्ट : ‘वृद्धेश्वर’वर आता नविन विश्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:40 AM2018-08-29T11:40:35+5:302018-08-29T11:40:40+5:30
श्रीक्षेत्र वृध्देश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची धर्मादाय आयुक्तांमार्फत पाच वर्षातून एकदा निवड केली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी अहमदनगरचे सहायक धर्मादाय आयुक्त ए. पी. दिवाण यांनी दिला.
करंजी : श्रीक्षेत्र वृध्देश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची धर्मादाय आयुक्तांमार्फत पाच वर्षातून एकदा निवड केली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी अहमदनगरचे सहायक धर्मादाय आयुक्त ए. पी. दिवाण यांनी दिला.
‘लोकमत’ने या देवस्थानमधील कारभार वृत्तमालिकेद्वारे चव्हाट्यावर आणून देवस्थान पदाधिकाऱ्यांच्या मनमानीविरोधात आवाज उठविला होता. त्यानंतर या देवस्थानच्या निवड प्रक्रियेलाच ग्रामस्थांच्या वतीने धर्मादाय उपायुक्तांकडे आव्हान देण्यात आले होते.
अतिशय प्राचीन व महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या वृध्देश्वर देवस्थानचा विकास येथील पदाधिकाºयांच्या मनमानीमुळे खुंटला होता. घाटसिरस ग्रामस्थांच्या वतीने हिंमत पडोळे व एकनाथ पाठक यांनी नगरच्या धर्मदाय उपायुक्तांकडे दावा दाखल करून वृध्देश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून ग्रामसभेतून विश्वस्तांची निवड करण्याची मागणी केली होती.
यावर सुनावणी होऊन मंगळवारी देवस्थानचे विश्वस्त मंडळ दर पाच वर्षांनी निवडण्याचा निर्णय धर्मादाय आयुक्तांनी दिला. यामुळे वृध्देश्वर देवस्थानच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्जदार पडोळे व पाठक यांच्यातर्फे अॅड. जयदीप देशपांडे यांनी बाजू मांडली.
फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा
वृध्देश्वर देवस्थानचे सुधाकर पालवे हे गेल्या ३० वर्षांपासून विश्वस्त होते. त्याआधी त्यांचे वडील शिवराम पालवे हे विश्वस्त होते. विश्वस्त व येथील गुरव, पुजारी व ग्रामस्थ यांच्यात नेहमी देवस्थानच्या कारभारावरून वाद होता. नगरच्या धर्मदाय उपायुक्तांनी नविन विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश दिल्यामुळे वृध्देश्वर भक्तांनी फटाके वाजवून नगरमध्ये तर ग्रामस्थांनी देवस्थानजवळ फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सरपंच इंदूताई चोथे, उपसरपंच नवनाथ पाठक, दादासाहेब चोथे, पंढरीनाथ चोथे, हिंमत पडोळे, एकनाथ पाठक, किरण पडोळे, रामनाथ जाधव, सुनील देव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
‘लोकमत’ने उठविला होता आवाज
पाथर्डी तालुक्यातील सर्वच देवस्थानांचा मोठा विकास झाला. मात्र वृध्देश्वर देवस्थान अतिशय जुने व प्राचीन असूनही येथील देवस्थानच्या विश्वस्तांकडून भक्तांसाठी सुविधा दिल्या जात नव्हत्या. या देवस्थानच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराबाबत ‘लोकमत’ने ‘संघर्ष वृध्देश्वरचा’ नावाने वृत्तमालिका प्रकाशित करून येथील कारभारावर प्रकाश टाकला होता.