अहमदनगर- विद्यार्थिनीवर बलात्कार, हत्याप्रकरणी तिघांना फाशी; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 12:08 PM2017-11-10T12:08:59+5:302017-11-10T12:41:14+5:30
पारनेरमधील लोणी-मावळा येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज, शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली.
अहमदनगर : पारनेरमधील लोणी-मावळा येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज, शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. संतोष विष्णू लोणकर (वय ३६), मंगेश दत्तात्रय लोणकर (३०) दत्तात्रय शंकर शिंदे (२७) अशी दोषींची नावं आहेत.
या प्रकरणातील तीन आरोपींनी कट रचून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. सरकारी पक्षाने समोर आणलेले साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्यानुसार आरोपींना मृत्युदंड हीच शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली.
लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खूनखटल्यात सोमवारी (दि़ ६) जिल्हा न्यायालयात दोष सिद्ध झाला. मंगळवारी आरोपी व सरकारी पक्षाच्या वतीने शिक्षेवर युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर या खटल्याचा निकाल १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता देण्यात येणार असल्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी सांगितले होते. त्यानुसार आज न्यायाधीश केवले यांनी आरोपींना शिक्षा सुनावली.
नेमकी घटना काय ?
लोणी मावळा येथे २२ ऑगस्ट २०१४ रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खुनाची घटना घडली. या घटनेच्या आधी संतोष लोणकर याने सदर मुलीची छेड काढून तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २२ ऑगस्टला संतोष लोणकरसह मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे यांनी तिचा पाठलाग केला. पीडित मुलीवर तिघांनी अत्याचार केला. त्यानंतर तिच्या नाका-तोंडात चिखल घातला. संतोष लोणकर याने मुलीच्या डोक्यावर स्कू्रड्रायव्हरने वार केले. मंगेश लोणकर याने तिच्या डोक्यात दगड घातला, तर दत्तात्रय शिंदे याने मुलीचे पाय पकडून ठेवले होते. तसेच मुलीच्या मृत्यूनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावर सर्वत्र चिखल टाकला होता. आरोपींनी अतिशय विकृत पद्धतीने हे कृत्य केले. या घटनेमुळे संपूर्ण नगर जिल्हा हादरून गेला होता. त्यामुळे या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली होती.