रोहित टेके ।
कोपरगाव : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच भुसार माल विक्रीसाठी आणल्यानंतर नियमानुसार अधिकृत काटा पावतीनुसार पक्की पट्टी तयार होते. त्यानंतर व्यापा-यामार्फत क्विंटलमागे एक किलोचा छुप्या पद्धतीने काटला (वजन कपात करणे) केला जातो. त्याच पावतीच्या मागील बाजूवर काटला व वाराईची रक्कम वजा केली जाते. या माध्यमातून शेतक-यांची लूट होत असून बाजार समिती प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
शेतक-यांना दिलेल्या अधिकृत पावतीतून अनधिकृत लुटीच्या अन्यायावर बाजार समितीचे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे बाजार समिती नेमकी कुणाची ? असा प्रश्न या निमिताने शेतक-यांमधून उपस्थित केला जात आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार, कांदा, भाजीपाला व डाळिंब या शेतमालाची खरेदी विक्री होते. भुसारासाठी १८, कांद्यासाठी २२, भाजीपाल्यासाठी ९ व डाळिंबासाठी ७ असे परवानाधारक व्यापारी आहेत.
शेतमालाच्या लिलावानंतर वजन करण्यासाठी व्यापा-याच्या शेडमध्ये वजन काटे व बाजार समितीचा भुईकाटा आहे. माझ्या सोयाबीनची बाजार समितीच्या भुईकाट्यावर वजन करून व्यापा-याकडे पट्टी बनविण्यासाठी गेलो. भुईकाट्यानुसार माझी सोयाबीन १९.९१ क्विंटलची पावती बनविली. त्यात पावतीच्या मागील बाजूस १९.९१ किलो वजन कपात केली. मी विरोध केला. तसेच सभापती यांच्याशी संपर्क साधला. तरीही उपयोग झाला नाही. त्यानंतर वजन कपातीचे ७०७ रुपये व वाराईचे ८० रुपये एकूण ७८७ रुपये व्यापा-याने कमी दिले आहे. त्यामुळे शेतक-यांची व्यापा-यांकडून लूट होत असताना बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सचिव दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचा शेतक-यांसाठी काहीही उपयोग नाही. -राजेंद्र मलिक, शेतकरी
बाजार समितीमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतमालाची वजन कपात केला जात नाही. कोणाची लेखी तक्रार आली तर चौकशी करून कारवाई करण्यात येईल.-परसराम सिनगर, सचिव, बाजार समिती, कोपरगाव.
शेतक-यांच्या भुसार मालाच्या वजनातून कोणत्याही प्रकारचा काटला काढला जात नाही. शेतक-यांना पट्टी दिली जाते. त्यात सर्व काही नमूद असते. - सुनीलकुमार कोठारी, भुसार मालाचे व्यापारी, कोपरगाव