प्रेमाला अंत नाही, व्यक्त करण्यासाठी कुठल्या एका दिवसाची गरजही नाही. ती चिरतरूण आणि आयुष्यभर मनात घर करून राहणारी भावना आहे. शेवटपर्यंत निभावले जाते तेच खरेखुरे प्रेम ठरते, अशी भावना येथील संजय छल्लारे व स्वाती छल्लारे या प्रेमवीर दाम्पत्याने व्यक्त केली. तीस वर्षांनंतरही वैैवाहिक जीवनात आमच्यासाठी रोजच व्हॅलेंटाईन डे असतो, अशी मिश्किल भावनाही त्यांनी बोलून दाखविली.व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रतिक्रिया घेतली असता दोघांनीही मनमोकळेपणाने आपले अनुभव मांडले. प्रेमाला व प्रेम विवाहाला पूर्वी फार टोकाचा विरोध असायचा. नातेवाईक मंडळी जातीत व नात्यात ठरवून विवाह लावत. आपण मात्र ही चाकोरी मोडली. हा निर्णय घेतल्याचा आपल्याला आजही अभिमान असल्याचे दोघांनीही ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आता सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी सहज-सोप्पी माध्यमं उपलब्ध आहेत. आमच्या वेळी मात्र मोबाईल नव्हते. कॉलेज व्यतिरिक्त भाजी मंडई, यात्रौत्सव ही भेटण्याची ठिकाणं होती. भावना व्यक्त करण्यासाठी केवळ चिठ्ठीचाच आधार घेत. अगदी ती वाचण्यासाठीही मोकळी जागा मिळायची नाही. एक मात्र खरे, चिठ्ठीत मनातील भावना व्यक्त करण्यासाठी फार विचारपूर्वक लिहावे लागते. विचार करूनच बोलावे लागते. त्यामुळे त्यात अधिक खरेपणा होता. तो हल्ली तितकासा पहायला मिळत नाही. आम्हाला त्यावेळी व्हॅलेंटाइन डे काय असतो हेही माहित नव्हतं. मनातील नि:स्वार्थ प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही डेची गरज नसते.प्रेम विवाह केल्यामुळे लोकांचं अधिकच लक्ष रहायचं. मात्र, जातीच्या भिंती तोडायच्या असतील तर प्रेम विवाहाखेरीज पर्याय नाही, असे छल्लारे दाम्पत्यानी सांगितले.प्रेम हे आंधळं असतं म्हणतात. मात्र ते डोळे झाकून कोणीही करू नये. विशेषत: मुलींना काळजी घ्यावी. आपले भविष्य अडचणीत सापडणार नाही हे पहायला हवे. ते निभावता आले पाहिजे, असे संजय व स्वाती छल्लारे म्हणाले.- शिवाजी पवार, श्रीरामपूर
प्रेमासाठी ‘एकच’ दिवस नसतो : वर्षभर व्हॅलेंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:07 AM