कोकणगाव (ता. संगमनेर) येथील नितीन गंगाधर जोंधळे या युवकाला सेंट्रल रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्याच्याकडून ५ लाख रुपये घेतले. या युवकाला टीसी पदावरील बनावट पत्र पाठवून फसवणूक केली. याप्रकरणी नितीन जोंधळे याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्याद दिली. त्यानुसार विजयकुमार श्रीपती पाटील (रा. श्रीकृष्ण कॉलनी, कोल्हापूर ह. रा. कंचन कन्फर्ट, निंबाळकर इस्टेट येवले वाडी, पुणे ) याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कासारे (ता. संगमनेर) येथील गोरक्षनाथ लहानू गांडोळे या युवकाची देखील रेल्वेत नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून त्याच्याकडून ५ लाख रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गोरक्षनाथ गांडोळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार विजयकुमार श्रीपती पाटील याच्या विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी पाटील याला अटक केली आहे. या गुन्ह्यांतील रवींद्र कांबळे (रा. कांबळे वस्ती, तासगाव जि. सांगली) व इंगोले (पूर्ण नाव माहीत नाही रा. शिक्षक कॉलनी, वर्धा) यांचा संगमनेर तालुका पोलीस शोध घेत आहेत. रेल्वेत नोकरी देतो, या आमिषाने पैसे घेऊन कुणाची फसवणूक झाली असल्यास त्वरित संगमनेर तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी केले आहे.