महारेराचा जिल्ह्यातील २१ बांधकाम प्रकल्पांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:22 AM2021-07-31T04:22:13+5:302021-07-31T04:22:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : बांधकाम व्यावसायिकांनी त्यांचे बांधकाम प्रकल्प वेळेत पूर्ण केले नसल्याने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : बांधकाम व्यावसायिकांनी त्यांचे बांधकाम प्रकल्प वेळेत पूर्ण केले नसल्याने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) अहमदनगर जिल्ह्यातील २१ बांधकाम प्रकल्प रद्द केले आहेत. या प्रकल्पांमधील फ्लॅट, बंगलो, रो-हाऊसच्या विक्रीस, जाहिरात करण्यास, मार्केटिंग करण्यास व बुकिंग करण्यास मनाई केली आहे.
महारेराच्या कायद्यानुसार गृहप्रकल्पांची नोंदणी करणे बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक करण्यात आहे. प्रकल्पाचे बांधकाम कधी पूर्ण होणार आणि कोणत्या महिन्यात ग्राहकांना ताब्यात देणार हेही प्रकल्प नोंदणीसाठी सादर करताना नमूद करणे बंधनकारक करण्यात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील २०१८ व २०१९ मधील २१ प्रकल्पांचे काम अपूर्ण असून, दिलेल्या वेळेत त्यांनी हे प्रकल्प ग्राहकांना दिले नाहीत. त्यामुळे त्यांचे हे प्रकल्पच महारेराने रद्द केले आहेत. त्यामुळे या रद्द करण्यात आलेल्या प्रकल्पांना आता घरांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रकारे घरांची मार्केटिंग, जाहिरात, बुकिंग करता येणार नाही. यामध्ये २०१८ मधील ७ व २०१८ मधील १४ प्रकल्पांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील नामांकित असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या एकाही प्रकल्पाचा यामध्ये समावेश नाही.
----
रद्द झालेले जिल्ह्यातील प्रकल्प
२०१८ मधील प्रकल्प
१) वेदा व्हेचर्स, वेदा प्राइव्ह, अहमदनगर.
२) मदन नेमीचंद बाफना, अरिहंत पार्क, फेज-३, पारनेर.
३) जे. पी. इंजिनिअर्स अँड बिल्डर्स, जेपी गुलमोहर, अहमदनगर.
४) गुरुदत्त बिल्डर्स, गुरुदत्त अपार्टमेंट, नेवासा.
५) ओंकार सुरेश जोशी, माउली हाइट्स, अहमदनगर.
६) नितीन मच्छिंद्र शेवाळे, सुकीर्ती अपार्टमेंट, फेज वन, अहमदनगर.
७) संतोष लहानबा पिसे, तहनाई फेज-२ टू, श्रीगोंदा.
२०१९ मधील प्रकल्प ...
१) श्रद्धा डेव्हलपर्स, श्रद्धा हाइट्स, नेवासा.
२) सोमनाथ गाडेकर, रेणुका अपार्टमेंट, राहता.
३) एन. के. कन्स्ट्रक्शन, सहयोग सोसायटी, कर्जत.
४) अलका देवीदास काकडे, निसर्गनिर्मित, अहमदनगर.
५) निवृत्ती कासार, स्पंदन रेसिडेन्सी, अहमदनगर.
६) यशश्री डेव्हलपर्स, गुलमोहर विंग-ए, पाथर्डी.
७) साहेबराव केशव तनपुरे, कैलास टॉवर्स, राहुरी.
८) त्रिमूर्ती डेव्हलपर्स, श्रीहरी रो बंगलो, अहमदनगर.
९) मोरया कन्स्ट्रक्शन, मोरया रेसिडेन्सी, श्रीगोंदा.
१०) कोठारी अणि वांढेकर असोसिएट्स, कोठारी हाइट्स,श्रीगोंदा.
११) रवींद्र बाळासाहेब खराडे, साई हेरिटेज, अहमदनगर.
१२) प्रकाश भानुदास कसबे, माउली अपार्टमेंट, अहमदनगर.
१३) रमण बाबासाहेब खामकर, वृंदावन सिटी, कर्जत.
१४) युनिकॉन डेव्हलपर्स, युनिकॉन नेक्स्ट वन, संगमनेर.
...........................
का केले प्रकल्प रद्द
बांधकाम व्यावसायिक सातत्याने प्रकल्प पूर्ण करण्यास विलंब करीत आहेत. तसेच ग्राहकांना प्रकल्प ताब्यात देण्यास बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून विलंब होत आहे. २०१८, २०१९ पासून ग्राहक घरांची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे असे प्रकल्प रद्द केले आहेत, असे महारेराने त्यांच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.