अहमदनगर: दरवाढीसह थकीत वेतन वसुलीच्या मागणीसाठी येथील रेल्वे मालधक्का कामगारांनी मंगळवारी येथील सहाय्यक कामगारआयुक्त कार्यालया समोर जोरदार निदर्शने केली. दोन आठवड्यात वसुली करून कामगारांच्या खात्यावर रक्कम जमा करा, अन्यथा कामगार रस्त्यावर उतरतील असा इशारा काँग्रेसच्या माथाडी कामगार विभागाच्या वतीने देण्यात आला.
काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे, माथाडी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले, माथाडी मंडळाचे सचिव बोरसे यांना कार्यालयात घेराव घालण्यात आला. यावेळी काळेंसह उबाळे, भिंगारदिवे, कामगारांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत चांगलेच धारेवर धरले. यावेळी बोलताना किरण काळे महणाले कामगारांच्या भावनांशी खेळण्याचे काम सुरू आहे. तारीख पे तारीख देऊन दिशाभूल केली जात आहे. माथाडी मंडळ नेमके कामगारांच्या हितासाठी काम करते की मुठभर भांडवलदारांसाठी. काँग्रेसचा माथाडी कामगार विभाग रेल्वे मालधक्क्यासह शहरातील सर्वच कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून दरवाढीसह थकीत वेतन वसुली कामी आता कोणत्याही परिस्थितीत मंडळाला पळ काढून दिला जाणार नाही. विलास उबाळे म्हणाले, आम्ही पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. कामगार व महसूल प्रशासन एकमेकांकडे बोट न दाखवता आपापसामध्ये समन्वय ठेवावा.