अकोलेतील ममताबाईचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 03:42 PM2019-11-17T15:42:23+5:302019-11-17T15:42:56+5:30
देवगाव येथील आदिवासी शेतकरी महिला ममताबाई भांगरे यांचे सेंद्रिय शेतीचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले.
हेमंत आवारी ।
अकोले : देवगाव येथील आदिवासी शेतकरी महिला ममताबाई भांगरे यांचे सेंद्रिय शेतीचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले. कोलकत्ता येथे झालेल्या आतंरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात भांगरे यांनी सहभाग नोंदवत सेंद्रिय भात शेती, नैसर्गिक परसबाग शेती, गांडुळ खतनिर्मितीविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूमी विज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या तिन्ही विभागाच्या वतीने कोलकात्ता येथे पाचवा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव नुकताच पार पडला. संमेलनात ममताबाई भांगरे यांनी दुर्गम आदिवासी भागात फुलवलेल्या सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केले. दुभाषिकाचे काम बायफचे जितीन साठे यांनी केले.
ममताबाई बायफ संस्थेशी ‘जनरल मिल्स’ या कंपनीने पुरस्कृत केलेल्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून पुढे आल्या. त्यांनी सेंद्रिय शेतीतून भात शेती तर नैसर्गिक शेतीतून परसबाग फुलवली. उत्तम रितीने गांडुळ खत निर्मिती केली आणि गांडुळ खताच्या छोट्या गोळ्या तयार केल्या. दोन रोपांमध्ये या गोळ््या गाडल्या. खत वाहून जाणार नाही, याची काळजी घेतली. त्यांचे हे संशोधन यशस्वी ठरले. याच पध्दतीने त्यांनी बियाणे गोळा करुन परसबाग रोपवाटिका तयार केली. विविध भाजीपाला पिकांच्या बियांचे संवर्धन त्यांनी केले. तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना कोलकात्ता येथील विज्ञान महोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
कामाची प्रशंसा
बायफचे विभाग प्रमुख जितीन साठे यांनीही संमेलनात मार्गदर्शन केले. विज्ञान - तंत्रज्ञान विभागाचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ममताबाई यांच्या कामाची प्रशंसा केली. खासदार रूपा गांगुली यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला. लीना बावडेकर, बाळासाहेब मुळे, राम कोतवाल, योगेश नवले, लीला कुºहे, रोहिदास भरीतकर, राम भांगरे यांनी ममताबाईंना प्रोत्साहन दिले.