कोपरगाव : यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो. यशस्वी होण्यासाठी कष्टच करावे लागतात. मराठी माणसाने न डगमगता धाडस केले तर तो जग पादाक्रांत करू शकतो. माझ्या मनात गरिबीविषयी चीड होती. त्यातूनच मी उद्योजक बनलो, असे आपल्या यशाचे गमक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी येथे उलगडले. मूळचे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावातील किरणा दुकानाचे संचालक ते दुबईस्थित अल अदिल समुहाचे व्यवस्थापकीय संचालक बनलेल्या दातार यांची रोटरी क्लबच्या स्नेह जल्लोष या कार्यक्रमात प्रकट मुलाखत झाली. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी दातार यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. ते म्हणाले, मी कोणतेच काम कमी लेखत नाही. जे काम मिळेल ते करीत राहिलो. मुंबईत प्रसंगी दारोदारी फिरून विविध उत्पादने विकली. यातून माझा आत्मविश्वास वाढत गेला. त्यातूनच यशाला गवसणी घालत गेलो. दुबईत गेल्यावर सुरूवातीला मिळेल ते काम केले. आईचे सर्व दागिने मोडून तेथे १५० स्क्वेअर फूट जागेत व्यवसाय सुरु केला. मात्र काही दिवसातच तो व्यवसाय तोट्यात गेला. मात्र, भारतात परत जाणार नाही असा निश्चय केला होता. दरम्यान इराक व कुवेत यांच्यात युद्ध झाल्याने त्यावेळी माझी १ रुपयाची वस्तू ४ रुपयाला विकली गेली. त्यातून व्यवसायाला उभारी मिळाली. आखाती देशात आपण ४१ सुपर मार्केटची निर्मिती करून रिटेल आऊट लेटचे जाळे निर्माण केले. तसेच ‘मसालाकिंग’ म्हणून आपली जी ख्याती झाली. त्यामागे केवळ मेहनत हेच एक भांडवल होते. कोणत्याही व्यवसायात यश मिळविण्यासाठी तीन वर्षे लागतात. पैशातूनच पैसा निर्माण केला जातो. कमविलेल्या पैशाचा स्वत:ही आनंद घ्या आणि गरजवंतांनाही मदत करा. माझे लहानपणापासूनच दुबईत जाण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी वयाच्या सोळाव्या वर्षी मी पासपोर्ट काढला आणि विसाव्या वर्षी दुबईत गेलो, असेही त्यांनी सांगितले.यावेळी डॉ.दातार यांच्या पत्नी वंदना दातार, आंतरराष्ट्रीय रोटरीचे निर्वाचित प्रेसिडेंट शेखर मेहता, आंतरराष्ट्रीय रोटरीचे प्रतिनिधी बांगलादेशचे डॉ. सलीम रेझा, गव्हर्नर राजेंद्र भामरे, अश्विनी भामरे, राशी मेहता, रुमा देवी, कॉन्फरन्स सल्लागार किशोर केडीया, नियोजित गव्हर्नर शब्बीर शाकीर, रमेश मेहर, आनंद झुनझुनवाला, मिडटाऊन प्रेसिडेंट संदीप पवार, रवींद्र ओस्तवाल, राजीव शर्मा, डॉ. महेश तेलरांधे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राकेश डिडवानीया, असिस्टंट गव्हर्नर प्रसाद पेठकर, नाना शेवाळे, कुंदन चव्हाण, दिनेश जाधव, सचिन शहा, शाम कासार, विलास शिरोरे, डॉ. विश्राम निकम, विनायक पाटील, डॉ. दिलीप भावसार, विलास सोनजे, डॉ. टी. पी. देवरे, दिलीप संन्याशीव, विठ्ठल तापडीया, राजेंद्र दिघे, सुमित बच्छाव, सर्जेराव पवार, राजेंद्र देवरे, प्रशांत पवार,संजय सूर्यवंशी, शामल सुरते, संगीता परदेशी, वंदना देवरे, वंदना चव्हाण, स्नेहल राहुडे उपस्थित होते. कॉन्फरन्स अध्यक्ष रवींद्र ओस्तवाल यांनी प्रास्ताविक केले. मयुर मर्चंट, अतुल शहा व टॉबी भगवागर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांचे भाषण झाले.गणितात पाचवेळा नापास तरीही यशस्वीमाझा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. वडील एअर फोर्समध्ये होते. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण हे शासकीय शाळेत झाले. शिक्षण घेत असताना खूप संघर्ष करावा लागला. मी शाळेतील शेवटून पहिला येणारा विद्यार्थी होतो. दहावीला तर गणितात पाच वेळा नापास झालो. परंतु शिक्षण पूर्णच करायचे अशी जिद्द मनात ठेऊन डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
मराठी माणसाने धाडस करणे आवश्यक- धनंजय दातार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:35 PM