पारनेरमध्ये पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 06:33 PM2018-05-04T18:33:55+5:302018-05-04T18:34:55+5:30
‘सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी... गं पोरी नवरी आली. गोऱ्या गो-या गालावरती चढली पाचूची लाली. गं पोरी नव...री आली. सजली नटली नवरी आली....’ असं म्हणत नवरदेव-नवरी विवाहबद्ध होणार, तोच फिल्मी स्टाईलने एंट्री झालेल्या पोलिसांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगता हा विवाह सोहळा रोखला. अन् नव-या मुलाकडील वºहाडास नवरीविना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.
पारनेर : ‘सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी... गं पोरी नवरी आली. गोऱ्या गो-या गालावरती चढली पाचूची लाली. गं पोरी नव...री आली. सजली नटली नवरी आली....’ असं म्हणत नवरदेव-नवरी विवाहबद्ध होणार, तोच फिल्मी स्टाईलने एंट्री झालेल्या पोलिसांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगता हा विवाह सोहळा रोखला. अन् नव-या मुलाकडील वºहाडास नवरीविना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील मंगल कार्यालयात शुक्रवार ४ मे रोजी हे नाट्य काही काळ चांगलेच रंगले. पारनेर तालुक्यातील एक गावातील मुलीचे लग्न जमले, साखरपुडा झाला, नवरा नवरीला हळद लागली, चुडा भरला आणि लग्नाचा दिवसही उजाडला. पै पाहुण्यांची लगबग सुरू झाली. नवरदेव घोड्यावर बसला. सनईच्या मंगल सुरात व-हाडी मंडळी वाजतगाजत मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचली. नवरदेव नवरी बोहोल्यावर चढण्याच्या अगोदर काही मिनिटातच याठिकाणी विवाह लावला जात असलेली मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती पारनेर पोलिसांना अहमदनगरच्या चाईल्डलाइन संस्थेकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा हा विवाह रोखला. त्यामुळे वराकडील व-हाडी मंडळींना मोकळ्या हाताने माघारी फिरण्याची वेळ आली.
टाकळी ढोकेश्वरच्या मंगल कार्यालयात शुक्रवार ४ मे रोजी दुपारी १२.३० वाजता तालुक्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीचा विवाह तालुक्यातीलच दुसºया गावातील मुलाशी आयोजित करण्यात आला होता. मात्र गावातील एका जागरूक नागरिकाने वधू मुलीचे वय कमी असल्याची तक्रार अहमदनगरच्या चाईल्डलाइन संस्थेकडे केली होती. त्यांनी पारनेर पोलिसांना याबाबत दिल्यानंतर पारनेर पोलिसांनी लग्न घटिकेच्या काही वेळ अगोदर या मुला मुलीकडील मंडळींना या अल्पवयीन मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्यात येईल, असा लेखी जबाब नोंदवून घेतला. पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शना खाली हेडकाँस्टेबल संतोष शेळके, शरद पवार, निवृत्ती साळवे आदींनी अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.