अहमदनगर : गावोगावी जागरण गोंधळ करून उपजीविका भागविणाऱ्या २५ वर्षीय लोककलावंत (मुरळी) महिलेवर तिघा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नगर शहरापासून जवळच असलेल्या नगर-बीड रोडवरील निंबोडी शिवारात १ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेनंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात २ एप्रिल रोजी रात्री पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तिघा आरोपींविरोधात बलात्कार, मारहाण या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अक्षय माळी व आकाश पोटे (रा. दोघे निंबोडी) या दोघा आरोपींना तत्काळ अटक केली. तिसरा आरोपी नीलेश पोटे हा फरार आहे.
पीडित महिला व तिचा आष्टी तालुक्यातील साथीदार हे १ एप्रिल रोजी नगर बीड-रोडने रात्री दहा वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून जात असताना ते निंबोडी शिवारातील एका बंद पडलेल्या हॉटेलजवळ लघुशंकेसाठी थांबले. यावेळी तिघा आरोपींनी या दोघांना अडवून त्यातील एकाने महिलेच्या साथीदाराला कंबर पट्ट्याने मारहाण करून त्याला बंदी बनविले. यावेळी इतर दोघांनी महिलेच्या केसाला धरून तिला बाजूला नेत आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा दोघांनी महिलेच्या साथीदाराजवळ थांबून तिसऱ्या आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. यावेळी आरोपींनी या दोघांकडे असलेले नऊ हजार रुपये व मोबाइल हिसकावून नेला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे हे दोघे घाबरून गेले होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली. या घटनेनंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक बेंडकोळी, पोलीस नाईक राजेंद्र सुद्रिक, द्वारके, अरुण मोरे यांच्या पथकाने दोघा आरोपींना निंबोडी परिसरातून अटक केली. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
..........
पीडित महिला सातारा जिल्ह्यातील
अत्याचाराची बळी ठरलेली पीडित महिला ही मूळची सातारा जिल्ह्यातील आहे. ती जागरणात मुरळी म्हणून काम करत असल्याने हल्ली ती तिच्या साथीदारासमवेत नगर तालुक्यातील एका गावात राहते. गुरुवारी रात्री साथीदारासमवेत गावाकडे जात असताना ही घटना घडली.