गोडी सेद्रिंय आंब्यांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:35 AM2018-06-15T11:35:39+5:302018-06-15T11:36:07+5:30
जखणगाव (ता.नगर) येथील शेतकरी बबन भागुजी कार्ले यांनी दोन हजार क्विंटल केशर आंबा सेंद्रिय पध्दतीने पिकवल्यामुळे परिसरातील गावांना या आंब्याची चांगलीच गोडी लागली आहे
नागेश सोनवणे
जखणगाव (ता.नगर) येथील शेतकरी बबन भागुजी कार्ले यांनी दोन हजार क्विंटल केशर आंबा सेंद्रिय पध्दतीने पिकवल्यामुळे परिसरातील गावांना या आंब्याची चांगलीच गोडी लागली आहे. कुठल्याही मार्केटला, बाजारात आंबे घेऊन न जाता घरीच या आंब्यांची विक्री होत आहे.
नगर शहरापासन अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जखणगाव येथील कार्ले वस्तीवर शेतकरी बबन भागुजी कार्ले व त्यांची पत्नी रंजना कार्ले यांच्याकडे आंब्याची बाग आहे. जवळपास शंभर झाडे आहेत. ही झाडे सहा वर्षांची झाली आहेत. तीन वर्षांनंतर या झाडाला फळ येण्यास सुरवात झाली. आंबे विकण्याचे हे तिसरे वर्ष आहे. या झाडाला कुठल्याही प्रकारचे रासायनिक औषध फवारणी केली जात नाही किंवा रासायनिक खते दिली नाहीत. प्रत्येक वर्षी शेणखत व पाणी दिले जाते. पाण्यासाठी शेततळे बांधले आहे. आंब्याच्या सिझनमध्ये एक महिना आंबा विक्री होते. झाडाला पाड तयार झाला की तो उतरुन घरामध्ये सेंद्रिय पध्दतीने पिकवला जातो. या आंब्याची गोडी पाहून परिसरातील हिंगणगाव, टाकळी, खातगाव, हिवरेबाजार, पिंपळगाव वाघा, नेप्ती, निमगाव, नगर शहरातून नागरिक आंबे घेण्यासाठी घरी येतात. एका वेळेस दहा ते पंधरा किलो आंबे घेऊन जातात. साठ ते सत्तर रुपये किलो दराने आंब्याची विक्री केली जाते. सरासरी एक लाख सत्तर हजार रुपये प्रत्येक वर्षी मिळतात. विशेष म्हणजे आंबे विक्रीसाठी कुठेही बाजारपेठेत जावे लागत नाही. ग्रामस्थ फोन करुन आंबे बुकिंग करतात. वनराज आंब्याचे एकच झाड आहे या आब्यांच्या झाडाला १४ कॅरेट आंबे निघतात. हे चवदार आहेत. सगळे मिळून दोन हजार क्विंटल आंबा निघतो. एका माहिन्यात एक लाख सत्तर हजार रुपये होतात. सेंद्रिय पध्दतीने आंबा पिकवत असल्यामुळे आंबे घेण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी असते.