अहमदनगर : शिक्षक बँकेच्या कर्जाची वसुली जिल्हा परिषद कशाच्या आधारे करते, असा सवाल उपस्थित करत सदस्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तसेच शिक्षकांनी लॉकडाऊनच्या काळात लाटलेल्या घरभाड्यावरून सदस्यांनी अक्रमक भूमिका घेतल्याने सभा चांगलीच गाजली.
जिल्हा परिषदेच्या अध्याक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सर्वसाधारण सभा झाली. काही सदस्य सभागृहातून तर काही पंचायत समितीतून ऑनलाईन सहभागी झाले होते. आई-वडिलांचा सांभाळ न करणारे अधिकारी व कर्मचारी किती आहेत, असा सवाल सदस्य राजेश परजणे यांनी उपस्थित केला. त्यावर आठ शिक्षकांबाबत आशा तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला. या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई झाली, अशी विचारणा सदस्यांनी केला असता कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ३० टक्के कपात करण्याची मागणी सदस्यांकडून केली गेली. मात्र, उपाध्यक्ष प्रताप शेळे याबाबत शासनाचे मार्गदर्शन नसल्याचे सांगून एकप्रकारे परजणे यांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे संतप्त झालेल्या परजणे यांनी मग शिक्षक बँकेच्या कर्जाची वसुली जिल्हा परिषद कशाच्या आधारे करते, असा सवाल उपस्थित केला. याबाबत अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख माहिती देताना म्हणाले, की, शिक्षक बँकेच्या कर्ज वसुलीशी अर्थ विभागाचा संबंध नाही. याबाबत जिल्हा परिषद प्रशासन आणि बँक यांची एकत्रित बैठक घेऊन चर्चा करावी. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसगार यांनी खुलासा केला. ते म्हणाले, जिल्हा परिषदेने हमी न दिल्यास कर्मचाऱ्यांना कर्ज मिळणार नाही, अशी भूमिका मांडली.
....
दिवाबत्तीच्या कामांची चौकशी
दलित वस्ती सुधार योजनेतील दिवाबत्तीची कामे निकृष्ट झालेली आहेत. मात्र, प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप शरद नवले यांनी केला. त्याची दखल घेत दिवाबत्तीच्या कामांची चौकशी करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी दिला.
..........................
माझा फोटाे काळा का छापला
जिल्हा परिषदेच्या दिनदर्शिकेत फोटो काळा का छापला, असा सवाल जालिंदर वाकचौरे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, निदान बायको-पोरांना दाखविता येईल, अशी डायरी तरी छापायची. वाकचौरे यांच्या या विधानाने सभागृहात एकच हशा पिकला.
.....................
संगमनेरचा विषय गाजला
जिल्हा परिषदेची जागा संगमनेर नगरपालिकेला देण्याच्या मुद्द्यावरून राजेश परजणे व अजय फटांगरे यांच्यात खडाजंगी झाली. हा विषय ऐनवेळच्या विषयात घेण्यात आला असून, याबाबत सभागृहाला माहिती का दिली गेली नााही, असा प्रश्न परजणे यांनी केला. आपल्या विषयाला विरोध होऊ लागल्याने राहात्याचा विषय नामंजूर करण्याची मागणी फटांगरे यांनी केली.