श्रीरामपूर : तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील कापसाच्या व्यापाºयास दहाहून अधिक जणांनी पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून लुटून त्यांच्याकडील ७५ लाख रुपये लांबविले. याप्रकरणी तीन जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये राहुरी येथील दोन प्रतिष्ठित व्यापारी बंधूंचा समावेश आहे. येथील एमआयडीसी परिसरात शुक्रवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.महांकाळवाडगाव येथील चांगदेव अंबादास पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून सचिन उदावंत, राहुल उदावंत (राहुरी), सर्वेश प्रजापती (जळगाव), शैैलेश उर्फ विकी भंडारी (धुळे), बिट्टू वायकर (श्रीरामपूर), दादासाहेब जाटे (गळनिंब, ता. श्रीरामपूर), राजेश शिंदे (संगमनेर) यांच्यासह अन्य सहा ते सात जणांवर फसवणूक, लूटमार तसेच आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे. यातील उदावंत बंधू व शैैलेश भंडारी यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.आरोपींची संख्या वाढण्याची शक्यतादरम्यान, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी घटनेचा तपशील दिला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. चांगदेव पवार व राहुरी येथील उदावंत बंधू हे कापसाचे व्यापारी आहेत. गेली अनेक वर्षे व्यापारानिमित्त त्यांचे चांगले संबंध होते. दोन हजार रुपयांच्या बदल्यात पाचशे रुपयांच्या नोटा बदलून घ्यावयाच्या होत्या. पवार यांनी उदावंत यांना हे पैैसे देण्याचे कबूल केले होते. ठरल्याप्रमाणेच पवार व उदावंत बंधू हे एमआयडीसी येथे गेले. मात्र तेथे सचिन उदावंत यांना मारहाण करण्याचा बनाव करत पवार यांच्याकडील ७५ लाख रुपये लुटण्यात आले. हा सर्व प्रकार संगनमताने घडला. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात आरोपींकडून आणखी काही माहिती समोर येणार आहे.
पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापा-याचे ७५ लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 4:30 PM