दिनेश जोशी । दहिगाव बोलका : मागील तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी झालेला पाऊस समाधानकारक असला तरी अवेळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांची पुरती वाट लागली आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झालेले असले तरी शासकीय आदेशानुसार एका शेतकºयाच्या केवळ दोन हेक्टरपर्यंतच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. नुकसानीपेक्षा कमी क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. दहिगावातील विमाधारक २७५ तर बिगर विमाधारक ३८७ शेतकºयांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. विमाधारक शेतकºयांच्या १९५.७२ हेक्टरमधील सोयाबीन १७४.५४ हेक्टर, बाजरी ११.२१ हेक्टर, कपाशी ९.९५ हेक्टर या पिकांचे पंचनामे झाले आहेत. बिगर विमाधारक शेतकºयांचे सोयाबीन ११९.२६ हेक्टर, मका १०८.६० हेक्टर, कपाशी २९.२८ हेक्टर, बाजरी ३४.०९ हेक्टर, तर कांदारोप ४.०९ हेक्टर असे २९३.३२ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे झाले आहेत. दहिगाव बोलका मंडलात २०१६ साली २३६ मिमी, २०१७ साली ४५५मिमी तर २०१८ साली २३६ मिमी तर यावर्षी ४८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीचा पाऊस २०१७ पेक्षा जास्त झाला असला तरी तो अवेळी झाला आहे. सोयाबीन सारख्या पिकाची वेळेवर सोंगणी न झाल्याने त्याच्या शेंगा फुटतात. सोंगलेल्या पिकांच्या शेंगामधील दाण्यांना मोड फुटतात, अशा प्रकारे सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान जास्त आहे. मळलेली सोयाबीन काळी पडल्याने भाव निम्म्याने कमी झाले आहेत. मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव यावर्षी मोठ्या प्रमाणात होता. ऐन सोंगणीच्या वेळी पावसाचा तडाखा बसल्याने मका पिकाचा चारा खराब झाला. सोंगूण ठेवलेल्या कणसांना मोड फुटले होते. कपाशी पिकात पावसाचे पाणी साचल्याने झाडे कुजून गेली तर कापसाची बोंडे गळून पडली. बाजरी काळी पडली असून उग्र वास येत आहे. उन्हाळा हंगामासाठी टाकलेली कांद्याची रोपे अती पावसाने व त्यानंतर आलेल्या धुईने भुईसपाट झाली आहेत.
‘दीड एकर बाजरी आजही वावरात उभी असून कणसे पूर्णपणे काळी पडली आहेत. आता ते पीक वावराबाहेर काढण्यासाठी घरातून पैसे घालावे लागतील, असे दत्तात्रय देशमुख यांनी सांगितले.
मी ७ एकरात सोयाबीनचे पीक घेतले होते. परंतु अवेळी झालेल्या पावसाने सोयाबीनचे दाणे पूर्णपणे काळे पडले आहेत, असे शेतकरी बाळासाहेब वलटे यांनी सांगितले.