पारनेर : बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ऑनलाईन बँकींगमधील पासवर्डचा वापर करून सेंट्रल बँकेच्या पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील शाखेच्या बँक मित्राने ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
सेंट्रल बँकेच्या वडझिरे येथील शाखेत जनधन योजना, संजय गांधी निराधार योजना लाभार्थीचे पैसे वाटप करणे, खात्यातून पैसे देणे, जमा करणे यासाठी बँक मित्र म्हणून एकाची नेमणूक केली होती. त्याने ग्राहकांनी बँक खात्यात जमा करण्यासाठी दिलेले पैसे जमा केलेच नाही. तसेच काहींच्या खात्यातून परस्पर पैसे काढणे, चेक आल्यावर रक्कम स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करणे अशा प्रकारे अनेकांच्या खात्यांतून पैसे काढून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
---
सोमवारपासून शाखेत ऑडिट
वडझिरे येथील बँक ग्राहकांनी बँकेकडे तक्रार केल्यावर पारनेर येथील शाखाधिकारी यांच्याकडे चौकशी अधिकारी म्हणून वरिष्ठांनी नेमणूक केल्याची माहिती उपलब्ध झाली. सोमवारपासून बँकेचे लेखा परीक्षण करण्यात येणार आहे. त्या तपासणीतून किती रुपयांचा गैरप्रकार झाला याची माहिती समोर येणार आहे. दरम्यान, या गैरव्यवहार प्रकरणाबाबत सेंट्रल बँकेचे वडझिरे शाखेतील अधिकारी यांच्याबरोबर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. महिला अधिकारी रजेवर गेल्या असून दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे प्रभारी कारभार आहे. याविषयी प्रभारी अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
----
बँकमित्रबरोबर व्यवहार करू नये
गैरव्यवहाराचा प्रकार उघड झाल्यानंतर बँकेने फलक लावला आहे. त्या बँकमित्रबरोबर व्यवहार करू नये. तो व्यवहार ग्राह्य धरला जाणार नाही, असे लिहिले आहे.
---
सेंटल बँकेतील वडझिरे शाखेत बँक मित्राने सामान्य गोरगरीब लोकांच्या पैशांचा गैरव्यवहार केला आहे. त्याची चौकशी करून ग्राहकांना रक्कम द्यावी.
-सोमनाथ दिघे,
उपसरपंच, वडझिरे