मुंबई - कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही एका आमदाराचं नाव महाराष्ट्रात कौतुकानं घेतलं गेलं. या आमदाराचं कोविड सेंटर राज्यात चर्चेचा विषय ठरला. हजारो रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हसू उलटविण्याचं काम कोरोनाच्या भीतीदायक, त्रासदायक काळात या माणसानं केलं. त्या, आमदार निलेश लंकेंना आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) ने निलेश लंकेंच्या कार्याचा गौरव करत त्यांचा सन्मान केला.
कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल आज मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान भेटला ही खुप मोठी गोष्ट आहे. हे सगळे शक्य झाले माझ्यावरती प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेमुळे व सहकाऱ्यांमुळे, असे ट्विट निलेश लंके यांनी केलं आहे. लंकेच्या कामगिरीची महाराष्ट्राने, राष्ट्रवादीने आणि विदेशातील भारतीयांनीही दखल घेतली होती. त्यातूनच, लंडन येथील बुक ऑफ रेकॉर्ड्स या पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आहे.
1100 बेडचं कोविड सेंटर उभारलं
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मतदारसंघातील नागरिकांनी आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे अकराशे बेडचे कोविड सेंटर उभारलं. त्यातील शंभर बेडला ऑक्सिजनची सुविधा होती. प्रत्येक रूग्णांसाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टिमर, नॅपकिन, पाणी बॉटली, साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जात आहे. २४ तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी, वापरण्यासाठी गरम पाणी. सकस जेवण. दूध, अंडी, सूप आदींचा समावेश यामध्ये आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक काढे दिले जात आहे.
विदेशातून मिळाली मदत
निलेश लंके यांनी केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसमावेशक मदत घेऊन, वर्गणी आणि देणगीतून हे कोविड सेंटर उभारलं. तसेच लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही आर्थिक मदत मिळाली. आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली. इतकेच नाही तर काही परदेशी नागरिकांनी देखील निलेश लंके प्रतिष्ठानच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत. केवळ परदेशातून १ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक मदत निलेश लंके यांना मिळाली आहे.
लोकमतनेही केलं सन्मानित
मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रूग्ण आढळत आहेत. जनतेची होणारी हेळसांड लक्षात घेऊन अत्याधुनिक, सुसज्ज असे ‘शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर ’ या नावाने पुन्हा एकदा भाळवणी येथे कोविड सेंटर सुरू केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही निलेश लंके यांनी लोकांसाठी कोविड सेंटर उभारलं होतं. त्याची पोहोच पावती म्हणून ‘लोकमत’ने ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इअर’ या पुरस्कारने सन्मानित केले होते, असं निलेश लंके यांनी सांगितले.
जयंत पाटलांनी भेट घेऊन केलं कौतुक
आमदार निलेश लंके यांनी संकटाच्या काळात दुःख वाटून घेतले आहे. माणुसकीचं नातं कसं जपावं हे त्यांनी दाखवले. शरद पवार यांचा कार्यकर्ता म्हणून ते शोभतात. जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा शरद पवार सामान्यांसाठी धावून जातात त्याचप्रमाणे निलेश लंके काम करत आहेत," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले आहे. पाटील यांनी लंकेंच्या कोविड सेंटरला भेट देऊन त्यांच्यावर कौतुकाची थाप मारली होती.