पैसे वसुलीची चौकशी करणार : सुधीर पारवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 11:53 AM2018-10-07T11:53:38+5:302018-10-07T11:53:42+5:30
आम्ही कोणालाही पैसे गोळा करायला सांगितले नव्हते. तशा सूचनाही दिल्या नव्हत्या. तरीही पंचायत राज समितीच्या नावाखाली कोणी पैसे वसुल केले असतील तर त्यांची सखोल चौकशी करुन कारवाई करु, असे पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी सांगितले.
अहमदनगर : आम्ही कोणालाही पैसे गोळा करायला सांगितले नव्हते. तशा सूचनाही दिल्या नव्हत्या. तरीही पंचायत राज समितीच्या नावाखाली कोणी पैसे वसुल केले असतील तर त्यांची सखोल चौकशी करुन कारवाई करु, असे पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी सांगितले.
शनिवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पारवे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली़. या बैठकीला समितीचे १८ सदस्य व जिल्हा परिषदेचे सर्व विद्यमान विभाग प्रमुख, तत्कालिन विभाग प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामांची माहिती घेऊन २०१३-१४ मधील लेखाआक्षेपांवर काय कारवाई केली किंवा का केली नाही, याची माहिती विभाग प्रमुखांकडून समितीने जाणून घेतली. त्यानंतर समितीचे अध्यक्ष आमदार पारवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पंचायत राज समितीच्या नावाखाली मोठा योगदान निधी गोळा केल्याची चर्चा तसेच समितीसाठी अधिकाऱ्यांनी केलेली सरबराई याबाबत पत्रकारांनी पारवे यांना विचारले. त्यावर पारवे म्हणाले, समिती एकही रुपया कोणाकडून घेत नाही. पारदर्शकपणे तपासण्या करुन कारवाई करण्याबाबत साक्ष लावलेल्या आहेत.
आमच्या नावावर कोणी पैसे वसुली केली असेल तर त्याबाबत चौकशी करणार असून सबंधितावर कारवाई करणार आहोत़ जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही त्रिस्तरीय यंत्रणा टिकली पाहिजे,असे पंचायत समितीचे मत असून त्याबाबत केंद्र व राज्य सरकारला शिफारस करणार असल्याचे पारवे म्हणाले.
राज्यात एक लाख आक्षेप प्रलंबित
राज्यात सहा विभागीय आयुक्त आहेत़ सर्व विभागीय आयुक्तांच्या मी मुंबईत बैठका घेतल्या़ राज्यातील जिल्हा परिषदांचे लेखाआक्षेप आणि आयुक्तांनी केलेली तपासणी यात ताळमेळ नसतो़ यांचे मुद्दे वेगळे, त्यांचे मुद्दे वेगळे असतात़ १००-१०० आक्षेप असतात़ त्यावर तात्काळ कारवाई होणे गरजेचे असते़ पण आयुक्त कारवाई करीत नाहीत़ राज्यात सध्यस्थितीत एक लाख आक्षेप प्रलंबित आहेत़
‘लोकमत’ वृत्तांकनाचा उल्लेख
पैसे वसुलीचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर पारवे म्हणाले, आम्ही पारदर्शक पद्धतीने काम केले आहे. अधिका-यांना कामाबाबत सूचना दिल्या आहेत. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्तांकन आले आहे़.ते वाचा, असे सांगत पारवे यांनी ‘लोकमत’च्या वृत्तांकनाचा उल्लेख केला.
‘सीईओं’ची साक्ष घेणार
जेथे त्रुटी आढळल्या त्याबाबतचे अहवाल मागवले आहेत. नगरमध्ये अनेक विभागांच्या कामांमध्ये त्रुटी आढळल्या असून, त्याबाबत अधिका-यांच्या साक्ष लावलेल्या आहेत. समिती येणार असल्याचे कळल्यावर साहित्याचे वाटप झाल्याचे दिसले. ही बाब योग्य नाही. त्यामुळे कारवाई झाली नसल्याने तत्कालीन व सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांची साक्ष समिती घेणार आहे. या साक्ष मुंबईत होतील, असे पारवे यांनी सांगितले.