जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दररोज पाच कोटींहून अधिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:21 AM2021-05-20T04:21:25+5:302021-05-20T04:21:25+5:30
श्रीरामपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेतल्यामुळे हंगामी पिके घेणाऱ्या भाजीपाला उत्पादक ...
श्रीरामपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेतल्यामुळे हंगामी पिके घेणाऱ्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयापूर्वीच स्थानिक प्रशासनाने अनेक ठिकाणी बाजार समित्यांचे व्यवहार बंद केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दररोज पाच कोटी रुपयांहून अधिक नुकसान होत आहे.
हंगामी पिके असलेली टरबूज, टोमॅटो, वांगी, मिरची व कांदा यांना जास्त फटका बसणार आहे. काही शेतमाल शेतातच फेकून देण्याची वेळ आली आहे. गुंठेवारी क्षेत्रात उत्पादित होणारी मेथी, शेपू, कोथिंबीर, पालक यांचीही हातावर विक्री करावी लागत आहे. उन्हाळ्यात याच काळात भाजीपाला पिकांना चांगले दर मिळतात; मात्र सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनचा फटका बसला आहे. ही सर्व नाशवंत पिके असल्यामुळे त्यांची साठवणूकही करता येत नाही.
कधी बाजार समितीचे व्यवहार ठप्प, कधी शहरे लॉकडाऊन तर कधी ग्रामपंचायतींनी पुकारलेला बंद यामुळे भाजीपाला विकायचा तरी कुठे? असा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. प्रत्येक बाजार समितीत दररोज होणारी ३० ते ४० लाख रुपयांची सरासरी उलाढाल थांबली आहे.
-----
मिरचीची तोडणी बंद
श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील शेतकरी विलास कदम यांनी एक एकर क्षेत्रावरील मिरचीची तोडणी बंद केल्याची माहिती दिली. या काळात किलोमागे ५० ते ६० रुपये दर मिळणे अपेक्षित होते; मात्र आता कुठेही मोठा खरेदीदार नसल्याने घरी जागेवरच ग्राहकांना किरकोळ विक्री करतो अशी कैफियत सांगितली.
-----
वांगी शेतातच फेकली
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील शेतकरी संदीप वर्पे यांनी वांगी शेतातच तोडून फेकून देत असल्याचे सांगितले. वांग्याचा सर्वात मोठा बाजार असलेली नाशिक बाजार समिती बंद आहे. त्यामुळे केवळ झाडावरील मालाची काढणी करून ते फेकून देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. टोमॅटोच्या २० किलो क्रेटचे दर अवघे १२० रुपयांवर आले आहेत असे वर्पे म्हणाले.
----
टरबूज ४ रुपये किलो
एरवी १० ते १२ रुपये किलो दराने विक्री होणारे टरबूज शेतकऱ्यांनी सध्या ग्राहकांअभावी घरातच ढीग मारून ठेवले आहेत. अनेक ठिकाणी महामार्गांवर ट्रॅक्टरमधून विक्रीचा प्रयत्न करून पाहिला. मात्र लॉकडाऊनमुळे तो प्रयोगही फसला.
----
ग्राहकांना मात्र चढे दर
लॉकडाऊन व बाजार समित्यांच्या बंदमुळे काही व्यापारी शेतकऱ्यांकडून पडलेल्या दरात मालाची खरेदी करतात. मात्र ग्राहकांना चढ्या दरांतच भाजीपाला उपलब्ध होत आहे. शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही आर्थिक झळ बसली आहे.
----
जिल्हाधिकारी यांनी बाजार समितीचे व्यवहार बंद केले असले तरी सायंकाळी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. किमान भाजीपाल्याचे व्यवहार सुरू ठेवण्यासाठी नव्याने मागणी केली जाणार आहे.
- अभय भिसे, सचिव, बाजार समिती, नगर