कोपरगाव : तालुका पातळीवर सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करण्यासाठी नगरपालिकांना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत करावी. तसेच स्वनिधीतून खर्च करण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी मिळावी, अशी मागणी अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी राज्याचे नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना नुकतेच निवेदन देत केली आहे.
वर्पे म्हणाले, कोरोना महामारीचा प्रसार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झालेला असून तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरांमध्ये हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या महामारीमध्ये बाधित झालेल्या लोकांवर उपचार करण्यासाठी सक्षम यंत्रणा तालुका पातळीवर व तालुका ग्रामीण रुग्णालयदेखील नसल्यामुळे रुग्णाचे हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपालिकांना रुग्णवाहिका, सिटीस्कॅन मशीन, रॅपिड अँटिजेन किटच्या खरेदीसाठी तसेच विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी जाचक अटी शिथिल करून नगरपालिकांना परवानगी द्यावी. तसेच नगरपालिका हद्दीत रस्ते, गटार, व्यायाम शाळा, उद्यान या विकास कामाबाबत आरोग्याशी संबंधित यंत्रणा प्राधान्याने उभी करण्यासाठी नगर विकास विभागाने मंजुरी देऊन नाविन्यपूर्ण योजना राज्यस्तरीय नगरोत्थान १४वा वित्त आयोग याअंतर्गत निधीची तरतूद करावी.