दारूच्या पार्टीतच मित्राचा गळा आवळून खून; मृतदेह रस्त्याच्या बाजूलाच दिला फेकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 01:18 PM2020-06-28T13:18:53+5:302020-06-28T13:19:27+5:30
पारनेर तालुक्यातील जवळे येथील तिघा मित्रांनी एकत्र बसून दारुची पार्टी केली. याच पार्टीत किरकोळ वाद झाला. अन् दोघांनी थेट तिस-या मित्राचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिला.
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील तिघा मित्रांनी एकत्र बसून दारुची पार्टी केली. याच पार्टीत किरकोळ वाद झाला. अन् दोघांनी थेट तिस-या मित्राचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिला. २६ जून रोजी ही घटना घडली. एकनाथ दत्तात्रय जाधव (वय ३७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जवळा येथील वामन विठ्ठल खुपटे (वय ४०), अप्पा उर्फ रोहित शिवाजी गवळी व एकनाथ दत्तात्रय जाधव हे तिघे जण २५ जून रोजी सकाळी साडेआकरा वाजता अप्पा गवळी याच्या मोटारसायकलवरून शिरुर तालुक्यातील मलठण परिसरात गेले होते. त्यानंतर दुस-या दिवशी गुरुवारी हे तिघे मलठण परिसरातील आमदाबाद येथील एका मंदिराच्या मागे बसून दारु प्याले. दारुची पार्टी सुरू असतानाच त्यांच्यात वाद झाला. या वादातून खुपटे व गवळी यांनी एकनाथ जाधव याला मारहाण करत त्याचा गळा आवळला. त्यानंतर आमदाबाद येथील रस्त्यालगत असलेल्या पेट्रोलपंपाच्या मागे मृतदेह फेकून दिला आणि दोघे आरोपी जवळा येथे आले.
एकनाथ घरी आला नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याची चौकशी केली. एकनाथ कुठे आहे? याबाबत वामन खुपटे याला विचारणा केल. तेव्हा त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. दरम्यान या घटनेबाबत पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी खुपटे याच्याकडे अधिक चौकश्ी केली. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
गवळी व त्यांच्या पथकाने खुपटे याला सोबत घेत शुक्रवारी रात्री मलठण परिसरात जेथे मृतदेह फेकला तेथे शोध घेतल. तेव्हा एकनाथ याचा मृतदेह आढळून आला. पारनेर पोलिसांनी दोघे आरोपी खुपटे व गवळी यांना शिरुर पोलिसांच्या ताब्यात दिले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.