अहमदनगर : भारतामध्ये संकटकाळात आदर्श सैनिक व अधिकारी निर्माण व्हावे, यासाठी १९४८ मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील युवकांना लष्करी प्रशिक्षण मिळावे, या हेतूने अहमदनगर जिल्ह्यात २९ नोव्हेंबर १९५५ रोजी संरक्षण मंत्रालयाच्या अधीन फक्त ६४ छात्र सैनिकांच्या संख्येवर बटालियनची सुरुवात करण्यात आली. एनसीसीच्या याच त्या सतरा महाराष्ट्र बटालियनला आज ६५ वर्षे पूर्ण होत असून दरवर्षी येथून अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी बाहेर पडतात.
भारतामधील ही सर्वात जुनी व नामवंत गौरवमय बटालियन असून या बटालियनने आजपर्यंत हजारो जवान, सेना अधिकारी, अर्धसैनिक दलांमध्ये व सिव्हील सेवांमध्ये अधिकारी, प्राचार्य, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी तसेच खासगी कंपनीमध्ये अधिकारी दिलेले आहेत. आज बटालियनची संख्या सेना दलातील बटालियनपेक्षा दुपटीने वाढलेली असून या बटालियनमध्ये २ नियमित सेना अधिकारी, ३२ छात्र सेना अधिकारी, ५ ज्युनिर कमिशन अधिकारी, १२ नॉन कमिशन अधिकारी, १८ सिविलीयन कार्यालयीन स्टाफ कार्यरत आहे.
विशेष महत्वाची बाब म्हणजे यामध्ये ३३ टक्के मुलींचा समावेश असून कर्नल जीवन झेंडे यांनी मुलींना प्रोत्साहित करण्यासंदर्भात विशेष मोहीम राबिवली आहे. या बटालियनला स्थापनेपासून आजपर्यंत वेगवेगळ्या सेना अधिकारी, जनरल पदाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देवून त्यांच्या कार्याची प्रशंसा केलेली आहे.
सर्वोत्कृष्ट एनसीसी अधिकारी म्हणून मेजर संजय चौधरी यांना सन्मानित करण्यात आले असून त्यांचा प्रजासत्ताक दिन व अन्य राज्य व राष्ट्रीय शिबिरांमध्ये समावेश आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये या बटालियनचे छात्रसैनिक सहभागी होतात. छात्रसैनिकांना कवायत, नकाशावाचन, लष्करी जीवनाची ओळख, युद्धनीती, सैन्य इतिहास, राष्ट्रीय एकात्मता, प्रशिक्षण तसेच सेनादलात जाण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविले जातात.
सध्या १७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे व प्रशासकीय अधिकारी विनय बाली असून कर्नल जीवन झेंडे यांना अनेक लष्करी प्रशंसापत्र पुरस्कार मिळालेलेे आहेत.