महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात काही दिवसांपुरता लॉकडाऊन केला आहे. पुण्यातही कडक निर्बंध लागू केले आहेत. नगरमध्येही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नियमांचे पालन करा अन्यथा कारवाईला समारे जा, अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर उद्योजकांनी मात्र लॉकडाऊन आता परवडणार नाही, असे स्पष्ट केले आहे. नगरच्या एमआयडीसीमध्ये उद्योजक आणि कामगार असे दोन्हीही पहिल्यापासूनच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत आहेत. मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, सॉनिटायझर वापरणे हे एकवेळ परवडेल, मात्र लॉकडाऊन मुळीच परवडणार नाही.
----------------
उद्योग संघटना-कामगार संघटना काय म्हणतात....
-------
उद्योजक, कामगार आणि सर्वसामान्य माणसालाही आता नियमांचे पालन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आधीच कोरोनाचे भीषण चटके सहन करीत, संघर्ष करीत आता कुठे तरी उभा राहतोय. याचवेळी पुन्हा संकट येते आहे. देव करो आणि हे संकट टळो. लॉकडाऊन झाले तर आता उद्योजकांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वत:ची काळजी म्हणून विलगीकरणारच राहावे लागेल.
- मिलिंद कुलकर्णी, उद्योजक
--------------------
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मास्क लावण्याचे, सॉनिटायझर वापरण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र कोरोना पुन्हा वाढत असल्याने सर्वच कंपन्यांमधील कामगार सतर्क झाले आहेत. सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन आता कामगारांच्या सोशल मीडिया ग्रुपवर सुरू झाले आहे. आता नियम पाळले नाही तर उद्योगाचे चक्र बंद पडू शकते आणि असे झाले तर ते कोणालाच परडणारे नाही. त्यामुळे नियमांचे पालन करण्यावर कामगार पुन्हा भर देत आहेत.
- योगेश गलांडे, कामगार संघटना
-------------
धोका वाढतोय
नगर जिल्ह्यातही रोज रुग्णांमध्ये सरासरी ५० ते ६० रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रतिदिवशी सरासरी १२५ ते १५० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, असे राज्यकर्ते आणि अधिकारी सांगत आहेत. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे एकूणच वातावरण धोकादायक बनले आहे.
-----------
एकण रुग्ण संख्या- ७४,३३५
आतापर्यंत बरे झालेले-७२,३४३
सध्या उपचार घेणारे-८७१
एकूण मृत्यू-१,१२१
------------
लॉकडाऊनचा संग्रहित फोटो