टँकर नकोत, पाईपलाईन हवी !

By Admin | Published: March 16, 2016 08:29 AM2016-03-16T08:29:05+5:302016-03-16T08:29:12+5:30

अहमदनगर : चोहोबाजूंनी एमआयडीसीमधील कारखाने आणि मध्यभागी वसलेला परिसर म्हणजे मनमाड रोडवरील माताजीनगर !

No tanker, no pipeline required! | टँकर नकोत, पाईपलाईन हवी !

टँकर नकोत, पाईपलाईन हवी !

अहमदनगर : चोहोबाजूंनी एमआयडीसीमधील कारखाने आणि मध्यभागी वसलेला परिसर म्हणजे मनमाड रोडवरील माताजीनगर ! ‘खेडे बरे, अशी अवस्था या भागाची आहे. आठ दिवसांनी येथे एकदा टँकरने पाणी येते. मात्र, या टँकरलाही आता नागरिक कंटाळले आहेत. टँकर नको, आता आम्हाला पाईपलाईन हवी आहे. प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी आले पाहिजे. पंधरा वर्ष झगडतोय. मात्र, नळ काही घरात येत नाहीत. शेजारच्या क्लबमध्ये पोहायला पाणी आहे. मात्र, आम्हाला प्यायला पाणी नाही’, अशा संतप्त भावना माताजीनगर परिसरातील महिला-नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामालगत माताजीनगर ही दोनशे घरांची वसाहत आहे.चोहोबाजूंनी एमआयडीसीमधील कारखाने आणि मध्यभागी ही वसाहत आहे. या वसाहतीला लोकमत टीमने मंगळवारी सकाळी भेट दिली. या वसाहतीच्या शेजारी एमआयडीसी, महापालिकेची पाईपलाईन जाते. मात्र, या भागाला अद्याप नळाद्वारे पाणी मिळत नाही. आठ दिवसांनी एखादा टँकर येतो. त्यावरच आठ दिवस काढावे लागतात. एमआयडीसीतील नोकरदार-कामगार वर्ग असल्याने ही वसाहत तशी सुशिक्षितांची आहे. मात्र या वसाहतीच्या विकासाकडे अद्याप सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. माताजीनगरमध्ये जलवाहिनी टाकण्याबाबत नागरिकांनी एमआयडीसी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. रस्ता, ड्रेनेजलाईन, कचराकुंडी अशा कोणत्याच सुविधा वसाहतीमध्ये नाहीत. दोन-तीन ठिकाणी पथदिवे आहेत. डीपीचा सांगाडा उभा आहे. विजेचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने वसाहत अनेकवेळा अंधारात असते. शौचालयांसाठी शोषखड्डे आहेत. सांडपाणी रस्त्यावर सोडले जाते. गटारी, ड्रेनेजलाईन अशा सुविधा नसल्याने या वसाहतीला खेड्यासारखी अवकळा आली आहे. मात्र येथील नागरिक सुशिक्षित असल्याने प्रत्येकाने घरासमोर स्वच्छता, टापटीप ठेवली आहे. कॉलनीच्या एका बाजूला कचऱ्याचे ढिगारे आहेत. कचरा उचलण्यासाठी घंटागाडी कधीच येत नाही. मनपाच्या मालकीचा मोकळा भूखंड एकाने भाजीपाला लावण्यासाठी ताब्यात घेतला आहे. मुलांना खेळण्यासाठी उद्यान-मैदान अशा कोणत्याही सुविधा नाहीत. रस्ते धुळीने माखलेले आहेत. एकाच लाईनमध्ये पथदिवे आहेत, इतरत्र अंधार.

उर्वरित प्रतिक्रिया पान ४ वर
मतदार नसलेला प्रभाग
माताजीनगरमध्ये ११२ घरे आहेत. सहाशेच्यावर लोकसंख्या आहे. २००० साली वसाहत स्थापन झाली आहे. येथील नागरिकांनी २००८ मध्ये शेवटचे मतदान केले. त्यानंतर मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. केवळ २२ जणांनीच २०१३ च्या महापालिका निवडणुकीत मतदान केले. ही नावे कोणी वगळली? हे कळत नाही. मतदार नसल्याने विकास कामांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. घरपट्टी घेतली जाते, मग मतदार का नाही? असा नागरिकांचा सवाल आहे.
ज्येष्ठ नागरिकाचा लढा : माताजीनगर परिसराच्या विकासासाठी ज्येष्ठ नागरिक विष्णू यादव भोर लढा देत आहेत. त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे माजी आमदार अनिल राठोड यांनी जिल्हा नियोजनला २००५ साली पत्र दिले होते. त्यांच्या पत्रामुळे एमआयडीसीने फक्त तीन दिवस पाणी दिले. रस्ते नाहीत, तर विकास आराखडा कसा मंजूर झाला, हा मोठा प्रश्न आहे. महापालिकेने एमआयडीसीकडून पाणी घ्यावे आणि ते आम्हाला द्यावे, असा भोर यांचा प्रस्ताव आहे. त्यांनी माताजीनगर सोसायटी स्थापन केली आहे. या सोसायटीद्वारे पाणी विकत घेण्याचा दुसरा पर्याय त्यांनी ठेवला आहे. सर्व नकाशे, पाठपुराव्याची पत्रे त्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधींना दाखविली.

Web Title: No tanker, no pipeline required!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.