स्वच्छतेत सुधारणा करण्याच्या पालिकेला सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 07:38 PM2019-07-10T19:38:05+5:302019-07-10T19:38:05+5:30
शहरातील सार्वजनिक शौचालये दुरुस्त करण्यासह खत प्रकल्पांच्या कामाला वेग देण्याच्या सूचना नाशिक येथील विभागीय उपसंचालक संगीता धायगुडे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत़
अहमदनगर: शहरातील सार्वजनिक शौचालये दुरुस्त करण्यासह खत प्रकल्पांच्या कामाला वेग देण्याच्या सूचना नाशिक येथील विभागीय उपसंचालक संगीता धायगुडे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत़ तसेच सफाई कामगारांमध्ये असलेले नैराश्य घालविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत़
शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी नाशिक येथील विभागीयउपसंचालक धायगुडे यांचे पथक मंगळवारी सकाळी नगरमध्ये दाखल झाले़ या पथकाने महापालिकेच्या सावेडी येथील खत प्रकल्पासह शहरातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली़ पाहणी दरम्यान शहरातील सार्वजनिक शौचालये नादुरुस्त असल्याचे आढळून आले़ सार्वजनिक शौचालयांचा स्वतंत्र आराखडा तयार करून ते दुरुस्त करण्याची सूचना यावेळी पथकाने दिली़ याअभियानांतर्गत घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, ओला सुका वेगळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे, यासाठी गुण आहेत़ त्याची पथकाने शहरातील ठिकठिकाणी भेट देऊन पाहणी केली असून, काही सुधारणा सुचविलेल्या आहेत़ सुचविलेल्या सुधारणा येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे़
केंद्र शासनाच्या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात राज्यभरातील महापालिका नगरपालिकांनी अनेक उपाययोजना केल्या़ परंतु, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहिला़ त्यामुळे केंद्रीय समिती येण्यापूर्वी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विभागीय स्तरावरील पथके तयार करण्यात आली आहे़ ही पथके महापालिकांना भेटी देऊन कागदपत्रांची तपासणी करण्याबरोबरच जागेवर जाऊन पाहणी करत आहेत़
अहमदनगर महापालिकेची जबाबदारी नाशिक येथील उपसंचालकांकडे सोपविण्यात आली असून, त्यांच्या पथकाने नगरला भेट देत सफाई कामगारांशीही संवाद साधला़ तसेच त्यांना योगा व प्राणायामचेही धडे दिले़ येत्या पंधरा दिवसांत त्यांना योगाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़