आता अण्णा हजारे म्हणणार, 'लावा रे तो व्हिडीओ'; मोदी सरकारविरोधात 'उपोषणास्त्र'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 06:10 AM2021-01-21T06:10:06+5:302021-01-21T06:58:58+5:30
शेतकऱ्यांबाबतच्या पत्रांना उत्तर नाही : हजारे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक पत्रे लिहिली. मात्र एकाही पत्राचे उत्तर अजूनही पंतप्रधान मोदी यांनी दिलेले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत.
पारनेर : २०११ मध्ये मी उपोषणाला बसलो. त्यावेळी माझ्या आंदोलनाचे कौतुक करीत होते. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मागण्यांबाबत पत्र पाठविले. त्याचे उत्तरही दिले जात नाही. त्यामुळे भाजप नेत्यांचे शेतकऱ्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे व कौतुकाचे व्हिडिओ जनतेला दाखविणार असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे दिली. ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून अण्णांची आजपासून जनजागृती सुरू होणार आहे.
स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगास स्वायत्तता द्या, अशी मागणी करीत अण्णा हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करणार आहेत.
हजारे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक पत्रे लिहिली. मात्र एकाही पत्राचे उत्तर अजूनही पंतप्रधान मोदी यांनी दिलेले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत.
यांचे आहेत व्हिडिओ -
२०१४ च्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह व अण्णा हजारे यांच्या कार्याचे कौतुक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन यांच्यासह नऊ प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ असून ते सोशल मीडियावर पाठविले जाणार आहेत.