आता नव्या घराचे स्वप्नही महागले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:42+5:302021-07-07T04:26:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केडगाव : गौण खनिज रॉयल्टी दरात झालेली वाढ, डिझेलचे वाढत चाललेले भाव तसेच जीएसटीसह इतर मूलभूत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
केडगाव : गौण खनिज रॉयल्टी दरात झालेली वाढ, डिझेलचे वाढत चाललेले भाव तसेच जीएसटीसह इतर मूलभूत वस्तुंच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने बांधकामासाठी आवश्यक असणारी खडी, क्रश सॅण्ड, डबरच्या किमती ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
अलीकडच्या काळात आरसीसी बांधकामांना प्राधान्य दिले जाते. त्यासाठी खडी, क्रशसॅण्ड, डबरची आवश्यकता असते. बरीच वर्षे यांच्या किमती स्थिर होत्या. मात्र, आता अचानक या किमती ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. १ जुलै २०२१ पासून राज्य सरकारने खडी, क्रशसॅण्ड, डबरच्या गौणखनिज राॅयल्टीत प्रतिब्रास ४०० रुपयांवरून प्रतिब्रास ६०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. तसेच जीएसटी, टीसीएस यांच्या दरातही वाढ झाल्याने गौणखनिज रॉयल्टीत प्रति ब्रास ८०० इतकी वाढ झाली आहे.
याशिवाय डिझेलचे दर ६० रुपये लिटरवरून थेट ९५ रुपये प्रतिलिटर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ट्रक, डंपर यांच्या किमती गेल्या चार वर्षांत २८ लाखांवरून ४२ लाखांपर्यंत गेल्या आहेत. ट्रकच्या टायरची जोडी ३५ हजारांवरून ४५ हजारांपर्यंत गेली आहे. याचा परिणाम वाहतूक खर्चात वाढ होण्यात झाला आहे.
सर्व स्टील व लोखंडचे दर ४० रुपयांवरून ७२ रुपये प्रति किलोवर पोहोचल्याने स्टोन क्रशर व वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी लागणारे स्पेअर पार्ट व मेंटेनन्स खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. तसेच कामगार, मजूर यांच्या पगारात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात विजेच्या दरात १५ टक्के वाढ झाली आहे. या सर्व वाढीचा परिणाम बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरावर झाला आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच साहित्यात भरमसाट वाढ झाल्याने आता नवीन बांधकाम करणे चांगलेच महागले आहे.
खडी, डबर पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांनी १ जुलैपासून २५ ते ३० टक्के प्रतिब्रास म्हणजे ४०० रुपयांप्रमाणे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका नवीन घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना बसणार आहे.
...........................
काय महागले
गौणखनिज रॉयल्टी - ३० टक्के वाढ
जीएसटी, टीसीएसमध्ये वाढ
डिझेल - ६० रुपयांवरून ९५ रुपये
वाहनांचे दर - २८ लाखांवरून ४२ लाख
ट्रकटायरची जोडी ३५ हजारांवरून ४५ हजार
लोखंड व स्टीलचे दर - ४० रुपयांवरून ७२ रुपये
मजुरीच्या दरात ३० टक्के वाढ
विजेच्या दरात १५ टक्के वाढ
.................
सध्या कोरोनाचा काळ आहे. एकतर व्यवसायात मंदी आहे आणि त्यात रॉयल्टीची वाढ न पडवडणारी आहे. डिझेलची रोजच दरवाढ सुरू आहे. रॉयल्टी व इतर बाबीत वाढ झाल्याने आम्हालाही खडी, क्रश सॅण्ड, डबरच्या किमती वाढवाव्या लागत आहेत.
-संपत लोटके, उपाध्यक्ष, नगर तालुका क्रशर असोसिएशन