अण्णा नवथरअहमदनगर : राज्य शिक्षण संचालनालयाने भाजीपाला व आहार शिजविण्यासाठी लागणाऱ्या गॅसचे पैसे थकविले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाच लाख विद्यार्थ्यांचा पोषण आहार गेल्या सात महिन्यांपासून भाजीपाल्याविना शिजत आहे. आहार शिजविणा-या मदतनीसांनाही पैसे मिळाले नसल्याने त्यांचीही परवड सुरू आहे.गोरगरिबांच्या मुलांना शाळेत पोटभर एकवेळचे जेवण मिळावे, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली़ कोट्यवधी रुपये खर्चून शाळेत आमटी, खिचडी शिजते़ अहमदनगर जिल्ह्यातील साडेचार हजार शाळांतील ५ लाख १७ हजार विद्यार्थ्यांसाठी रोज पोषण आहार शिजविला जातो. त्यासाठी तांदूळ, हरभरा दाळ, मटकींसह मीठ, मसाला हा कोरडा शिधा शासनाकडून मिळतो़ त्यात भाजीपाला घालून शाळेतील स्वयंपाकीण मुलांसाठी आमटी, भात खिचडी, असा पोषण आहार शिजवितात. गेल्या जानेवारीनंतर भाजीपाला व गॅसचे पैसेच शाळांना मिळालेले नाहीत. आॅनलाईन पैसे जमा करायचे आहेत, असे सांगून जिल्हा परिषदांना एप्रिलपासून पैसे देणे बंद केले गेले. त्यानंतर सात महिन्यांत आॅनलाईन पेमेंट किंवा आॅफलाईन या पैकी कोणत्याही पद्धतीने पैसे मिळाले नाहीत. तेंव्हापासून स्वयंपाकिण ताई चुलीवरच जसा मिळेल तसा पोषण आहार मुलांना खाऊ घालते आहे. पण त्यांचेही पैसे शिक्षण मंडळाने सात महिन्यांपासून दिलेले नाही. सहा महिन्यानंतर ११ सप्टेंबर रोजी मुख्याध्यापकांच्या खात्यावर १ रुपया टाकण्याचा प्रयोग शिक्षण संचालनालयाने केला़ परंतु, तोही यशस्वी झाला नाही.
भाजीपाल्याविना शिजतोय पोषण आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:29 PM