कटुंबातील एकट्या ५० महिला कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:18 AM2021-04-05T04:18:35+5:302021-04-05T04:18:35+5:30
अहमदनगर : कुटुंबातील पुरुष मंडळींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास खाजगी किंवा सरकारी रुग्णालयांत उपचार घेता येतात; परंतु एकट्या महिलेचाच अहवाल ...
अहमदनगर : कुटुंबातील पुरुष मंडळींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास खाजगी किंवा सरकारी रुग्णालयांत उपचार घेता येतात; परंतु एकट्या महिलेचाच अहवाल जर पॉझिटिव्ह आला, तर काय करायचे, तिला एकटीला कुठे ठेवायचे, उपचाराबरोबरच तिच्या सुरक्षेचे काय, असे एक ना अनेक प्रश्न मनात घोंगावतात. अशा कुटुंबातील एकट्या कोरोनाबाधित महिलांसाठी महापालिकेेने पुढाकार घेऊन स्वतंत्र महिला कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये सध्या २१ महिला उपचार घेत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत महिलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर नव्हते. संपूर्ण कुटुंब, पती-पत्नी, असे दोघेही पॉझिटिव्ह आल्यास ते एका वाॅर्डात उपचार घेऊ शकतात; परंतु कुटुंबातील एकटी महिला पॉझिटिव्ह आल्यास त्या कुटुंबासमोर अनेक प्रश्न उभे राहतात. उपचाराबरोबरच महिलांची सुरक्षाही महत्त्वाची असते. ही गरज लक्षात घेऊन महापालिकेने दुसऱ्या लाटेला सामोरे जाताना महिलांसाठी येथील जैन पितळे बोर्डिंगच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू केले. सुरुवातीला ाया सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिला दाखल होत नव्हत्या; परंतु रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली. महिलांसाठी महापालिकेचे जैन पितळे बोर्डिंग हे सुरक्षित कोविड सेंटर असल्याची भावना नातेवाइकांमध्ये आहे. आतापर्यंत ५० महिला कोरोनामुक्त झाल्या आहेत. कोरोनाबाधित महिलांकडून योगा करून घेतला जात असून, त्यांना वेळेवर नाश्ता व जेवणही पुरवितात. याशिवाय त्यांची नियमित तपासणी केली जात असल्याने महिला कोरानामुक्त होत असून, कुटुंबातील एकट्या कोरोनाबाधित महिलांसाठी हे सेंटर एक प्रकारे संजीवनी ठरले आहे.
....
कुटुंबातील महिला व तिचा बाळाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित महिलेला महापालिकेच्या जैन पितळे बोर्डिंग येथील महिला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून घेले जात असून, आतापर्यंत २६ महिला कोरोनामुक्त झाल्या आहेत.
-डॉ. प्रदीप कळमकर, वैद्यकीय अधिकारी, महापालिका
....
फोटो
०४ पितळे बोर्डिंग