साईमंदिर उघडणे हा भाविक व शिर्डीकरांसाठी आनंदाचा क्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 11:14 AM2021-09-25T11:14:40+5:302021-09-25T11:15:58+5:30
साईसंस्थान सीईओ भाग्यश्री बाणायत :आनंददायी दर्शनाबरोबरच भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य
शिर्डी : साईमंदिर उघडण्याचा राज्यशासनाने घेतलेला निर्णय हा देश-विदेशातील साईभक्तांसाठी व शिर्डीकरांसाठी आनंदाचा क्षण आहे. आम्हीही भाविकांच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत. शासनाच्या सुचनेनुसार कोविडचे नियम पाळून भाविकांना आनंददायी दर्शन देतांनाच त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य असेल असे साईसंस्थानच्या सीईओ भाग्यश्री बाणायत यांनी लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले. भाविकांसाठी मंदिरे उघडण्याच्या सरकारच्या निर्णयाने गेल्या दोन वर्षांपासून निपचित पडलेल्या साईनगरीत नवचैतन्य आले आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानंतर साईसंस्थान व्यवस्थापन, प्रशासनाने मंदिर उघडण्यासाठी पुर्वतयारी सुरू केली आहे. याबाबत भाग्यश्री बाणायत यांनी आज लोकमतशी बोलतांना सांगितले की, राज्य शासनाने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला ही भाविकांसाठी व शिर्डीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हळुहळु सर्व पुर्वपदावर येईल. शासनाचे व कोविडचे नियम पाळुन भाविकांना दर्शन देतांना त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य असेल. प्रत्येक भाविकाचे स्क्रिनिंग करण्यात येईल, मास्क, सॅनिटायझरचा वापर अत्यावश्यक असेल, कोरोनाची लक्षणे नसणारांनाच दर्शनाला मंदिरात जाता येईल. कोविडच्या पार्श्वभुमीवर भाविकांना मुर्ती, पादुकांना हस्तस्पर्श करता येणार नाही, पारायण कक्ष, सत्यनारायण व अभिषेकपुजा तुर्तास बंदच ठेवण्यात येतील. प्रवेशाचे व बाहेर पडण्याचे मार्ग नियंत्रित व मर्यादित असतील. कोरोनाचा संसर्ग होईल अशा गोष्टी कटाक्षाने टाळण्यात येतील. रांगेतून चालणाºया भाविकांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे लागणार असल्याने रोज जास्तीतजास्त कीती भाविकांना दर्शन देता येईल याबाबत आम्ही अभ्यास करत आहोत. मंदिर उघडण्यासाठी व भाविकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत.
गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक विंवचेनेत असलेल्या शिर्डीतही नवचैतन्य आले आहे. व्यवसायिक आनंदी आहेत. दुकाने, लॉजेस, रेस्टॉरंट आदींची स्वच्छतेसारख्या तयारींनीही वेग घेतला आहे. अनेकांची वीज बील थकल्याने वीज जोडणी तोडण्यात आलेली आहे. बीले भरल्याशिवाय कनेक्शन जोडले जाणार नाही, व्यवसाय सुरू करण्यासाठीही पैसे लागणार आहेत. या पार्श्वभुमीवर मात्र व्यवसायिक चिंतेत आहेत.