बाळासाहेब काकडे ।
श्रीगोंदा : कोरोनाकाळात भाजीपाला शेती तोट्याची ठरली. कुकडी, घोड धरणाच्या पाण्याचीही हमी राहिली नाही. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांनी आता फळबाग लागवडीकडे मोर्चा वळविला आहे.
२०२०-२१ मध्ये श्रीगोंदा तालुका कृषी विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून ३५० हेक्टर क्षेत्रावर उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी आगामी तीन वर्षात तीन कोटीचे अनुदान मिळणार आहे. तालुक्यातील विविध भागातील शेती आणि शेतीच्या बांधावर फळबाग लागवडीची धूम सुरू होणार आहे. यामध्ये लिंबू, चिकू, सीताफळ, आंबा, चिंच, नारळ, संत्रासारख्या फळबागांना खड्डे खोदणे लागवडीपासून तीन वर्षे फळबागांचे संगोपन करण्यासाठी शासन महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून अनुदान देणार आहे.
शेतातील व बांधावर आंबा, काजू, बोर, सीताफळ, लिंबू, कवट, जांभूळ, नारळ, साग, संत्रा, सोनचाफा, कडीपत्ता, कडूनिंब, शेवगा, हादगा आदी फळझाडे लावता येतील. अशोक, हिरडा, बेरडा, अर्जुन आदी औषधी वनस्पती, झाडे लागवड करता येणार आहे. याचा लाभ अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, दारिद्रय रेषेखालील, मनरेगा जॉबकार्डधारक लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील. लाभार्थ्यांच्या नावास ग्रामसभेचा मंजुरी आवश्यक आहे.
शासनाने सर्वसामान्य शेतक-यांना आर्थिक स्थैर्य येण्यासाठी फळबाग लागवड योजना आणली आहे. या योजनेसाठी मनरेगा योजनेतून अनुदान देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. -पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा