उड्डाणपुलाचे काम महीन्यात सुरू करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 04:46 PM2019-07-09T16:46:34+5:302019-07-09T16:47:28+5:30
शहरातील उड्डाणपुलाच्या कामाची सुरूवात महीन्याभरात करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विभागाच्या अधिका-यांना दिल्या असल्याची माहीती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.
अहमदनगर : शहरातील उड्डाणपुलाच्या कामाची सुरूवात महीन्याभरात करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विभागाच्या अधिका-यांना दिल्या असल्याची माहीती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.
शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भात खासदार डॉ.विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून या उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू होण्यासंदर्भात मागणी केली. याबाबतचे सविस्तर निवेदनही त्यांनी मंत्र्याना दिले. गडकरी यांनी उड्डाणपुलाच्या कामाची वस्तूस्थिती जाणून घेतली. या कामाला प्रशासकीय मंजूरी मिळून निविदा प्रक्रीया पूर्ण झाली असताना केवळ भूसंपादनाच्या कारणामुळे हे काम सुरू होवू शकत नसल्याची बाब विखे यांनीनिदर्शनास आणून दिली.
उड्डाणपुलाच्या कामासाठी काही ठिकाणी बाकी असलेल्या भूसंपादनाचा कोणताही अडथळा कामात येवू न देता या कामाला सुरूवात करून, राहीलेले भूसंपादन सहा महीन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही गडकरी यांनी अधिका-यांना दिले असल्याचे सांगितले. नगर शहरातील उड्डाण पुलाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. लोकसभा निवडणुकीच्या निमिताने या कामाला प्राधान्य देवून मार्गी लावण्याचा शब्द आपण दिला होता त्याची प्रत्यक्ष सुरूवात आता झाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घेतलेले सकारात्मक निर्णय नगरकरांना दिलासा देणारे असल्याचे खा.डॉ.विखे यांनी सांगितले.