प्रतिकूलतेवर मात करत तेशवानीची अभिनयात झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 03:09 PM2020-06-28T15:09:08+5:302020-06-28T15:11:13+5:30
लहानपणापासून अभिनयाची आवड, घरची परिस्थिती बेताची, चित्रपटसृष्टीत कोणी ओळखीचे नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामीण भागातील तेशवानी वेताळ हिने अभिनयात चांगलीच झेप घेतली आहे.
नानासाहेब जठार ।
विसापूर : लहानपणापासून अभिनयाची आवड, घरची परिस्थिती बेताची, चित्रपटसृष्टीत कोणी ओळखीचे नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामीण भागातील तेशवानी वेताळ हिने अभिनयात चांगलीच झेप घेतली आहे.
सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या तेशवानीचे मूळगाव पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद आहे. तिचे वडील रमेश वेताळ हे वाहन चालक आहेत. आई संगीता ही घर सांभाळते. रांजणगाव मशीद हे दुष्काळी गाव आहे. त्यामुळे तेशवानीच्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची होती.
गावात शेतीवाडी नसल्याने तिच्या वडिलांनी उपजीविकेसाठी कुटुंबासह पुण्यात जाण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला ते दुसºयाच्या ट्रकवर चालक होते. नंतर त्यांनी स्वत:ची ट्रक घेतली. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. अशा सर्वसामान्य कुटुंबात तेशवानीचा २००३ मध्ये जन्म झाला. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अगदी पहिलीत असतानाच तिने शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन अभिनयाची चुणूक दाखवत असे. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिला आई, वडिलांनी प्रोत्साहन दिले.
२०११ साली तिसरीत असताना चित्रपट निर्माते विश्वास राजणे यांनी तिला ‘झेंडा स्वाभिमान’ या चित्रपटात प्रमुख भूमिका करण्याची संधी दिली. या चित्रपटातून तिने अल्पवयातच यशस्वी पदार्पण केले. चित्रपटातून सिने अभिनेत्री साकारत असताना तिने शिक्षणात खंड पडू दिला नाही. मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ७९ टक्के गुणांनी ती उत्तीर्ण झाली होती. यावर्षी ती म्हाळसाकांत कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत आहे. तिने झेंडा स्वाभिमानाचा, पतंग, घुमा, आठवणी माहेरच्या या चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारली, तर मन-मनथाचा, धूम-धूमधडाका, पॉकेटमनी, न्यायाम, वा पैलवान, बाजार, दाहवी, यलो, आयटमगिरी या चित्रपटातही सहायकाची भूमिका केली.
तू माझा सांगाती, बे दुणे चार, बोधीवृक्ष या मालिकातही तिने अभिनयाचा ठसा उमटविला. सळो की पळो, युग प्रवर्तक छत्रपती शिवराय या नाटकातही तिने अभिनय केला आहे. संकल्प गोळे यांचे काळी मैना व माझ्या प्रेमाचा होकार देना, अजय-अतुल यांच्या वणवा पेटला, साजन-विशाल यांचे येडा येडा या गाण्यातही तिने नृत्य केले आहे.
लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची आवड होती. या क्षेत्रात करिअर करावे यासाठी मला आई-वडिलांनी चांगली साथ दिली. चित्रपट दिग्दर्शक विश्वास राजणे यांनी सर्व प्रथम चित्रपटात संधी दिली. त्यामुळे या क्षेत्रात कमी वयात नाव कमावू शकले. या क्षेत्रात जे लोक माझ्या पाठीशी आहेत, त्यांची मी ऋणी आहे.
-तेशवानी वेताळ, अभिनेत्री