Oxygen : शिर्डीजवळील प्लॅन्टमध्ये युद्धपातळीवर ऑक्सिजन निर्मिती सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 02:10 PM2021-05-01T14:10:48+5:302021-05-01T14:12:06+5:30

Oxygen : लोहारे येथील भाऊराव पोकळे या तरुणाने दोन वर्षे अविश्रांत मेहनत घेवून साईराज गॅसेस या नावाने ऑक्सिजन प्लॅन्ट उभारला आहे.

Oxygen: Plant near Shirdi starts producing oxygen on a war footing | Oxygen : शिर्डीजवळील प्लॅन्टमध्ये युद्धपातळीवर ऑक्सिजन निर्मिती सुरू

Oxygen : शिर्डीजवळील प्लॅन्टमध्ये युद्धपातळीवर ऑक्सिजन निर्मिती सुरू

ठळक मुद्देआमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करून ऑक्सिजन निर्मितीचा श्रीगणेशा करण्यात आला.

- प्रमोद आहेर

शिर्डी : लिक्वीड अभावी बंद असलेल्या लोहारे येथील ऑक्सीजन प्लॅन्टला आज दहा टन लिक्वीड उपलब्ध झाले. या प्लॅन्टमध्ये ऑक्सिजन निर्मितीला तातडीने सुरूवात करण्यात आली असून राहाता व कोपरगाव तालुक्यातील रूग्णांना या माध्यमातून महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर संजीवनी मिळाली आहे.

लोहारे येथील भाऊराव पोकळे या तरुणाने दोन वर्षे अविश्रांत मेहनत घेवून साईराज गॅसेस या नावाने ऑक्सिजन प्लॅन्ट उभारला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढल्याने प्रशासन व लोकप्रतिनीधींनी लक्ष घालून तातडीने या प्लॅन्टला परवाना मिळवून दिला. मात्र या प्लॅन्टसाठी मेडीकल लिक्वीड ऑक्सीजन उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे हा प्लॅन्ट बंद होता.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील व प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी राहाता, शिर्डी, कोपरगावात ऑक्सिजनच्या निर्माण झालेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर या प्लॅन्टसाठी लिक्वीड मिळवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. यामुळे आज गुजरात वरून एक दहा टनाचा टँकर उपलब्ध झाल्याने या प्लॅन्ट मध्ये ऑक्सीजन उत्पादन सुरू करण्यात आले.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करून ऑक्सिजन निर्मितीचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, नायब तहसिलदार रंधे, मंडलाधिकारी मांढरे, कचरू पोकळे मास्तर व उद्योजक भाऊराव पोकळे उपस्थित होते.

सध्या रुग्णालये व कोरोनाचे रूग्ण ऑक्सिजनच्या कमतरतेशी झुंज देत आहेत. संगमनेर व सिन्नर तालुक्यातील प्लॅन्टमधून ऑक्सिजन सिलिंडर मिळणे बंद झाल्याने चार दिवसांपासून राहाता व कोपरगाव तालुक्यात आणीबाणीची परिस्थीती निर्माण झाली होती. अनेक रूग्णालयांनी ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रूग्णांना अ‍ॅडमिट करून घेणे बंद केले होते, तर उपचार सुरू असलेल्या रूग्णांनाही पर्यायी व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते. प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसिलदार कुंदन हिरे यांनी धावपळ करून औरंगाबाद व नगरवरून काही सिलिंडर मिळवून रूग्णांना तात्पुरता दिलासा दिला होता.

या प्लॅन्टमध्ये ऑक्सिजन निर्मितीला सुरूवात झाल्याने आठवडाभर तरी दोन्ही तालुक्याला ऑक्सिजन पुरवठा होवू शकतो. दरम्यान आणखी लिक्वीड टँकर मिळवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या प्लॅन्टला आवश्यक तेवढे लिक्वीड उपलब्ध झाले तर हा प्लॅन्ट उत्तर नगर जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागवू शकतो.

Web Title: Oxygen: Plant near Shirdi starts producing oxygen on a war footing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.