पंचायत राज समिती : १५ दिवसांची तयारी आणि १२ तासांची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 04:44 PM2018-10-06T16:44:28+5:302018-10-06T16:44:31+5:30
पंचायत राज समिती येणार म्हणुन नगर पंचायत समिती गेल्या १५ दिवसांपासून तयारी करत होती.
केडगाव : पंचायत राज समिती येणार म्हणुन नगर पंचायत समिती गेल्या १५ दिवसांपासून तयारी करत होती. सकाळी ७ वाजल्यापासून समितीची सुरू असलेली प्रतिक्षा तब्बल १२ तासांनी संपली. रात्री साडे नऊ वाजता एकदाची बैठक संपली आणि सर्वानींच सुटकेचा निश्वास टाकला. शालेय पोषण आहार, आरोग्य तपासणी, जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळेची गुणवत्ता तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा तपशील या विषयाला धरुन पंचायत राज समितीने अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. समिती सदस्यांच्या प्रश्नांसमोर अधिका-यांची चांगलीच भंबेरी उडाली.
नगर पंचायत समितीत पंचायत राज समितीने आधिका-यांची आढावा बैठक घेतली. शिक्षण विभागात शालेय तपासणी होते का? या तपासणी मध्ये कोण कोण असते? किती शाळांना भेटी दिल्या? याचा अहवाल सभापतींना कळवला का? प्राथमिक शाळांपेक्षा खाजगी शाळांचा दर्जा चांगला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेंच्या शिक्षकांना पन्नास हजार पगार आहे. खाजगी शाळेतील शिक्षकांना चार ते पाच हजार रुपये पगार आहे, तरी पण खाजगी शाळांचा दर्जा चांगला. जिल्हा परिषदेच्या शाळेतील सातवीच्या मुलांना रवी शब्द इंग्रजीतून लिहिता येत नाही ही शोकांतिका आहे. मार्च अखेर ४८ लाख रुपये लाभार्थ्यांचे शिल्लक कसे राहिले? आरोग्य अधिकारी यांना विचारले शालेय तपासणी केली त्याचे वेळापत्रक आहे का? या पथकात कोण असते? वर्षभरात किती तपासणी होतात. याची माहिती शिक्षण विभागाला दिली का? अशा प्रश्नांची सरबत्ती झाल्याने अधिकारी गांगरून गेले.
दरम्यान आरोग्य विभागाला विचारले की कुपोषीत बालके किती, जन्म-मृत्यू दर किती? किती महिलांना भेटी दिल्या? उपकेंद्राना भेटी दिल्या का? अहवाल आहे का? आहार दिला जातो का? याची कधी चौकशी पाहणी केली? बाल विकास अधिकारी यांना विचारले की कमी वजनाचे बालक किती?
पाणी पुरवठा विभागाला हिंगणगाव येथील सदोष मीटर बाबत जाब विचारला, लवकरात लवकर मीटर बदला जास्त बील आले त्याची शहनीशा करा, असा आदेश दिला. या सर्व कामांचा अहवाल गटविकास अधिका-यांनी आम्हास द्यावा, अशा सूचना समितीने केली.